Lockdown 4.0 | देशात कुठे आणि कसा उठणार लॉकडाऊन?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला असून या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. यामध्ये केंद्र सरकारने अनेक अधिकार राज्यांना दिले आहेत.
नवी दिल्ली : लॉकडाऊनचा चौथा टप्पा कालपासून (सोमवार) सुरु झाला. देशातल्या अनेक राज्यांनी या चौथ्या टप्प्यात महत्वाचे बदल केलेत. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूकही सुरु होताना दिसतेय. महाराष्ट्रात मात्र चौथ्या टप्प्यातही अद्याप कुठली नवी शिथीलता पाहायला मिळत नाही. भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पाहुयात देशभरात कुठे कसा उठतोय लॉकडाऊन...
दिल्ली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक देशातील अशा अनेक राज्यांनी चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये अधिक शिथीलता आणली आहे. कुठे सार्वजनिक बस नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहेत. तर कुठे जीवनावश्यक वगळता इतर दुकानंही सुरु होत आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राज्यांना मिळाल्यानंतर अनेक राज्यांत हे बदल पाहायला मिळत आहेत.
केरळ
केरळमध्ये 50 टक्के क्षमतेसह बस वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी आसन क्षमता कमी केल्यानं बसच्या तिकीटातही वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये सलून, ब्युटी पार्लर्सनाही परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी एसी लावण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच फक्त बेसिक सुविधाच ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात याव्यात, अशी अटही प्रशासनाने घातली आहे. केरळमध्ये सध्या 630 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच भारतात कोरोना पहिला रुग्ण केरळ राज्यातच आढळून आला होता. परंतु, केरळ सरकारने ही संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं आहे.
कर्नाटक
कर्नाटकमध्येही काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून काही गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये एका बसमध्ये 30 प्रवासी या अटीवर सार्वजनिक वाहतुकीस परवानगी दिली आहे. रेड झोन वगळता इतर ठिकाणी ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकांनाही एकावेळी फक्त दोन प्रवासी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कर्नाटक सरकारने महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांना 31 मेपर्यंत राज्यात येण्यास बंदी घातली आहे.
दिल्ली
देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्येही कोरोनाचा कहर दिसून येत आहे. दिल्ली सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑड-इव्हन पद्धतीने ही दुकानं उघडण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्याशिवाय एका बसमध्ये 20 प्रवासी आणि टॅक्सी कॅबमध्ये फक्त दोन प्रवासी या अटींवर वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. ऑटो रिक्षा आणि ई रिक्षालाही केवळ एक प्रवासी नेण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या दहा हजारांच्या आजपास आहे.
तामिळनाडू
महाराष्ट्रापाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असलेले राज्य म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूतही काही बंधनं शिथील करण्यात आली आहेत. ज्या 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे तिथे त्यांनी शिथीलता दिली नाही. पण इतर 25 जिल्ह्यांमध्ये मात्र बऱ्याच सवलती देण्यात आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : कोरोना लसीच्या दाव्यानंतर मॉडर्ना कंपनीच्या शेअर्समध्ये 39 टक्क्यांनी वाढ
लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा नव्या रंगरुपातला असेल, असं पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना सांगितलं होतं. तसेच हा लढा जास्तीत जास्त टार्गेटेड पद्धतीनं लढण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार राज्यांनी त्यांच्या पातळीवर हे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात मात्र अद्याप कुठलीही नवी शिथीलता जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन 3 आणि लॉकडाऊन 4 महाराष्ट्रात सारखेच आहेत का? असाही प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे, राज्यांना मिळालेले अधिकार. झोन ठरवण्यापासून ते अगदी स्थानिक पातळीवरील निर्बंध ठरवण्याचे आणि आंतरराज्यीय वाहतूक सुरु करण्याचे अधिकार राज्यांना मिळाले आहेत. पण अनेक राज्यं कोरोनाशी लढतानाच अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठीही प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मुंबईसारख्या शहरात तर कोरोना रोखणं हे सर्वात आव्हानात्मक आहे. त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रात अद्याप शिथीलता देण्यात आलेली नाही. काल (सोमवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी बोलताना रेड झोनमध्ये कुठलीही शिथीलता देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण त्यामुळे इतर झोनमध्येही आधीचेच नियम कायम राहणार का, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाही. त्यामुळे हा गोंधळ लवकर संपेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.