Goa Congress BJP : भाजपचे 'काँग्रेस तोडो'; गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह 8 आमदार पक्ष सोडणार?
Goa Congress BJP : गोव्यात भाजपकडून काँग्रेसला आणखी एक धक्का दिला जाणार असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेत्यांसह आठ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.
Goa Politics : देशभरात काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) सुरू असताना दुसरीकडे भाजपने (BJP) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार आज भाजपात प्रवेश करणार असल्याचे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी हा दावा केला आहे.
काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 11 जागांवर विजय मिळाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. भाजपात सामिल होणाऱ्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात.
जुलै महिन्यात गोव्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जुलै महिन्यातच काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. भाजप काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावेळी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून मायकल लोबो यांना हटवण्याची घोषणा केली होती. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची ऑफर दिली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
कोणते आमदार भाजपात जाणार?
दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलियालाह लोबो, केदार नाईक, राजेश फलदेसाई, संकल्प आमोणकर, रुडोल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा
संख्याबळ किती?
गोवा विधानसभेत सध्या भाजपकडे 20 आमदार आहेत. तर, काँग्रेसकडे 11 जागा आहेत. त्याशिवाय, महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाकडे दोन, गोवा फॉरवर्ड पक्षाचा एक आमदार आहे. तर, अन्य पक्षांकडे सहा जागा आहेत. काँग्रेसचे आठ आमदार भाजपात सामिल झाल्यास काँग्रेसकडे तीन आमदार शिल्लक राहतील.