(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather : कुठे उष्णतेची लाट तर कुठे मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather : देशातील काही भागात उष्णता जाणवत आहे. तर काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
Weather updates : भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह, अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. यामुळं लोक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे केरळ आणि आंध्र प्रदेशात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळं अनेक राज्यांचे हवामान आल्हाददायक राहिले आहे.
दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत कडक उन जाणवत आहे. दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहतील आणि आर्द्रता राहील. उत्तर प्रदेशातील उष्णतेनेही लोकांची तारांबळ उडाली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना घरातच राहावे लागले आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, 15 जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
विविध राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशाच्या अनेक भागात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओडिशातील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. याशिवाय या राज्यांमध्ये तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
या भागात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे. यासोबतच दिवसभर हवामान कोरडे राहील. राजस्थानमध्ये वादळामुळे हवामान कोरडे राहील. 16 ते 17 जून रोजी राज्याच्या नैऋत्य भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये पावसाला सुरुवात
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. तर मंगळवारी (13 जून) मुंबईत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. 'बिपरजॉय'च्या प्रभावामुळे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: