ICAI CA final exam result 2020 | सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर, मुंबईची कोमल जैन, तामिळनाडूचा एस्साकिराज अव्वल
ICAI CA final exam result : सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीए नव्या अभ्यासक्रमात मुंबईच्या कोमल जैनने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सीए जुन्या अभ्यासक्रमात तामिळनाडूच्या एस्साकिराज ए अव्वल ठरला आहे.
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कोमल जैनने 800 पैकी 600 गुण (75 टक्के) मिळवत देशात पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे. कोमलने पोदार कॉलेजमध्ये बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं असून सीए परीक्षेची त्यादरम्यान ती तयारी करत होती. सूरतचा मुदित अग्रवाल 73. 63 टक्क्यांसह दुसऱ्या आणि मुंबईचीच राजवी भाद्रेश नाथवनी 73. 38 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
तर सीए जुन्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत तामिळनाडूच्या सलेममध्ये राहणाऱ्या एस्साकिराज एने 800 पैकी 553 गुण (69. 13 टक्के) अव्वल स्थान पटकावलं. चेन्नईची श्रीप्रिया आर 62. 63 टक्क्यांसह दुसऱ्या आणि जयपूरचा मयंक सिंह 61. 13 टक्क्यांसह देशात तिसऱ्या स्थानावर आहे.
परीक्षेचा निकाल icaiexam.icai.org किंवा caresults.icai.org या वेबसाईटवर पाहता येईल.
जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाचा निकाल किती टक्के? - सीए जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 5. 84 टक्के तर नव्या अभ्यासक्रमाचा निकाल 14. 47 टक्के लागला आहे. - सीए जुन्या अभ्यासक्रमात ग्रुप-I आणि ग्रुप-II दोन्ही मिळून एकूण 4143 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 242 उत्तीर्ण झाले. - सीए नव्या अभ्यासक्रमात ग्रुप-I आणि ग्रुप-II मिळून एकूण 19284 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 2790 पास झाले आहेत. असा पाहा निकाल - सीए अंतिम परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी icai. org या वेबसाईटवर जा. - कँडिडेट्स पोर्टलवर क्लिक करा. - आयसीएआय रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पिन कोड टाका. - सीए मेरिट लिस्टमध्ये समोर येईल. यात विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे की नाही हे समजेल. - विद्यार्थी वेबसाईटवर All India merit लिस्टही पाहू शकतात. - सीए फायनल रँक कार्डचा वापर नंतर केला जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची प्रिंटआउट अवश्य काढा.