(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दीड हजार फूट उंचीवर लटकलेल्या ट्रॉलीत अडकलेल्या मुलांसाठी वायुसेनेचा गरुड कमांडो ठरला 'देवदूत'
गरुड कमांडोने आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि माणुसकीचं दर्शन घडवत दुर्घटनाग्रस्त रोपवेवर अडकलेल्या ट्रॉली क्रमांक सहामध्ये असलेल्या दोन मुलांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
Deoghar Ropeway Mishap : झारखंडच्या देवघरमध्ये रविवार (10 एप्रिल) झालेल्या रोपवे दुर्घटनेत दीड हजार फूट उंचीवर अडकलेल्या केबल कार ट्रॉली क्रमांक सहामध्ये दोन लहान मुलांना धीर देण्यासाठी वायुसेनेचा एक गरुड कमांडो स्वेच्छेने संपूर्ण रात्र त्यांच्यासोबत राहिला. त्याने दाखवलेल्या माणुसकीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
देवघर रोपवे दुर्घटना रविवार घडली. 48 जण सुमारे डझनभर केबल कारच्या ट्रॉलीमध्ये दीड ते दोन हजार फुटांच्या उंचीवर अडकले. त्यांना कसं वाचवावं असा प्रश्न राज्य सरकारसमोर होता. अशातच भारत सरकारने हवाई दलाच्या एमआय 17 हेलिकाप्टरसह गरुड कमांडोंना मदत आणि बचावकार्यासाठी त्रिकुट डोंगरावर पाठवलं.
बचाव कार्यादरम्यान सोमवारी (11 एप्रिल) संध्याकाळ होता होता ट्रॉली क्रमांक सहामध्ये दोन लहान मुलं राहिली. अंधार झाल्याने त्यांना तिथून बाहेर काढलं नाही. या मुलांना मंगळवारी (12 एप्रिल) सकाळी ट्रॉलीमध्ये बाहेर काढून कुटुंबियांना सोपवलं जाईल. पण या मुलांना ट्रॉलीमधून बाहेर काढण्यासाठी पोहोचलेला गरुड कमांडो द्विधा मनस्थितीत होता.
एकीकडे त्याचे साथीदार त्याला हेलिकॉप्टरमध्ये परत येण्यासाठी आवाज देत होते. तर दुसरीकडे ट्रॉलीमधले दोन मुलं त्याच्याकडे मोठ्या आशेने बघत होते.
या घटनेचे साक्षीदार झारखंड पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक आर के मलिक यांनी सांगितलं की, वायुसेनेच्या त्या गरुड कमांडोने आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि माणुसकीचं दर्शन घडवत दुर्घटनाग्रस्त रोपवेवर अडकलेल्या ट्रॉली क्रमांक सहामध्ये असलेल्या दोन मुलांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या जीवाची पर्वा न करता तो हेलिकॉप्टर सोडून ट्रॉलीमध्ये चढला.
संपूर्ण रात्र मुलांसोबत राहत कमांडोने मुलांना धीर दिला. मंगळवारी पहाटे वायुसेनेचं एमआय 17 हेलिकॉप्टर मदत आणि बचाव कार्यासाठी त्रिकुट पर्वतावर पोहोचल्यानंतर गरुड कमांडोने एकेका मुलाला आपल्या कुशीत घेऊन हेलिकॉप्टरमध्ये नेलं. यानंतर त्या मुलांना सुरक्षितरित्या जमिनीवर उतरवलं. वायुसेनेच्या या गरुड कमांडोने आपलं नाव सांगितलं नाही. पण त्याच्या माणुसकीचं चहूबाजूंनी कौतुक होत आहे.