Hemant Soren Bail : मोठी बातमी, हेमंत सोरेन यांना देखील जामीन मंजूर, झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय
Hemant Soren : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाला आहे. हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जामीन मंजूर झाला आहे. हेमंत सोरेन यांना कथित जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात ईडीनं (ED) अटक केली होती. झारखंड उच्च न्यायालयानं हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केली आहे. उच्च न्यायालयात यापूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. आज निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री असताना हेमंत सोरेन यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली होती.न्यायालयानं 13 जूनला सुनावणी पूर्ण केली होती. आज निर्णय जाहीर करण्यात आला असून हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.. 8.86 एकर जमिनीवर ताबा मिळवल्या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली होती. ईडीनं हेमंत सोरेन यांना पीएमएलए अंतर्गत कारवाई करत अटक केली होती.
हेमंत सोरेन हे प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्यानं त्यांना जामीन मंजूर केल्यास ते चौकशीवर प्रभाव पाडू शकतात, असं म्हणत ईडीनं जामिनाला विरोध केला होता.
हेमंत सोरेन यांनी अटकेची कारवाई ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. राजकीय सूड भावनेतून अटक करण्यात आल्याचं हेमंत सोरेन यांनी म्हटलं होतं. हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केल्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता. झारखंड मुक्ती मोर्चाला देखील हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानं दिलासा मिळणार आहे.
झारखंड मध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका होणं झारखंड मुक्ती मोर्चा आणि इंडिया आघाडी साठी फायदेशीर ठरणार आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सक्रीय झाल्या होत्या. पक्षातील वरिष्ठ नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. कल्पना सोरेन यांनी नुकतीच विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती त्यात त्या विजयी झाल्या होत्या.
हेमंत सोरेन यांची सुटका झामुमोला फायदेशीर ठरणार
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख नेते हेमंत सोरेन यांची सुटका होणं महत्त्वाच आहे. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टानं त्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे सीबीआयनं अरविंद केजीरवाल यांना अटक केली. आता हेमंत सोरेन हे तुरुंगाबाहेर कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
मातोरीत छगन भुजबळांनी दगडफेक करायला सांगितली असेल, त्यांना राज्यात दंगली घडवायच्यात: मनोज जरांगे