एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी, विरोधकांकडूनही चोख प्रत्युत्तर
Vidhan Sabha Monsoon Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत 'एक मोदी, सब पे भारी, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Vidhan Sabha Monsoon Session ) आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात अनेक बड्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे दिसून आले आहे.
सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका
विधिमंडळ अधिवेशनाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत 'एक मोदी, सब पे भारी, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. 'घ्या ओ घ्या... विरोधी पक्ष नेत्याचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या...! असा आशयाचाही बॅनरवर उल्लेख होता. शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Camp) आमदारांकडून ही बॅनरबाजी करत इंडिया आघाडीविरोधात (India Aghadi) आंदोलन करण्यात आले.
गाजराच्या माळा हातात घेत विरोधक सत्ताधाऱ्यांवर बरसले
त्यानंतर सत्ताधारी आंदोलन करत असतानाच त्यांच्या पुढे विरोधक उभे राहिले आणि त्यांनीही राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले. अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार,शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, असा आशयाचे बॅनर झळकावत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आमदारांनी गाजराच्या माळा हातात घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आज दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात बड्या घोषणा?
दरम्यान, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी सरकार कोणकोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य सरकार यावेळी महिलांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. राज्य सरकार यावेळी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार आर्थिक दुर्बल महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये देण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकारकडून तरुणांसाठीही मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!