Hathras Case | पीडितेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या; सीबीआयकडून चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल
हाथरस प्रकरणी सीबीआयच्या वतीनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात चारही आरोपींनी पीडितेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं सांगितलं आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा पार केली होती. तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरुन संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. याप्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता याप्रकरणी सीबीआयने चार आरोपींना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीटमध्ये तरुणीसोबत सामूहिक बलात्कार करुन त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं आहे. शुक्रवारी सीबीआयच्या वतीनं दोन हजार पानांहून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली. आता संपूर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या हाथरस प्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी सुनावणी पार पडणार आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस केसमध्ये 19 वर्षीय एका दलित तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. आता याप्रकरणी सीबीआयने चारही आरोपींविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्या विरोधात गँगरेप आणि हत्येचा आरोप लावला आहे.
14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिने 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर 30 सप्टेंबरला रात्री पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले.
फॉरेन्सिक चाचण्याही करण्यात आल्या
दरम्यान, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "अंत्यसंस्कार कुटुंबियांच्या इच्छेनुसारचं करण्यात आले आहेत." अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, तपास यंत्रणांनी आरोपींच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सांगितलं की, गुजरातच्या गांधीनंगर येथील प्रयोगशाळेत आरोपींच्या विविध फॉरेन्सिक चाचण्याही करण्यात आल्या आहेत.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांचीही भेट घेतली होती. अत्याचारानंतर पीडितेला याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.
सत्यमेव जयते : प्रियंका गांधी
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "एकीकडे अन्याय होता, तर दुसरीकडे कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा होती. पीडितेच्या पार्थिवावर जबरदस्तीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेला बदनाम करण्याचे प्रयत्नही झाले. कुटुंबियांना धमकावण्यात आलं. परंतु, शेवटी सत्याचाच विजय झाला. सत्यमेव जयते."
एक तरफ सरकार सरंक्षित अन्याय था। दूसरी तरफ परिवार की न्याय की आस थी।
पीड़िता का शव जबरदस्ती जला दिया गया। पीड़िता को बदनाम करने की कोशिशें हुईं। परिवार को धमकाया गया। लेकिन अंततः सत्य की जीत हुई। सत्यमेव जयते#HathrasCase pic.twitter.com/X4qD0BVjjs — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 18, 2020
दरम्यान, हाथरस प्रकरणानंतर योगी सरकारवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठीही पोहोचले होते. परंतु, पहिल्यांदा त्यांना भेटू दिलं नाही. त्यावेळी त्या दोघांनाही रस्त्यातच अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नव्हता
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नव्हता. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले, त्याचप्रमाणे या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं होतं. या शवविच्छेदन अहवालानुसार, "पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे." तसंच गळ्यावर जखमांचे निशाण होते. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता, असंही अहवालात नमूद केलं होतं.
14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास
14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.