H3N2 Virus : कोरोनानंतर आता H3N2 चं तांडव? दोन जणांचा मृत्यू, केंद्र सरकारने बोलावली महत्त्वाची बैठक
H3N2 Influenza Deaths : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की, गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या H3N2 रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते आणि 7 टक्के रुग्णांना ICU मध्ये भरती करावं लागत आहे.
H3N2 Influenza Cases In India : देश आता कुठे कोरोनातून सावरत असताना H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली आहे. भारतात H3N2 इन्फ्लूएंझाच्या दोन रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू (Coronavirus) प्रमाणे आता H3N2 विषाणू तांडव करणार की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. H3N2 विषाणू व्हायरल इन्फेक्शन असून यामध्ये सर्दी, ताप आणि खोकला ही सामान्य लक्षणं आहेत. H3N2 विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाची बैठक बोलावली आहे.
H3N2 इन्फ्लुएंझा विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू
देशात व्हायरल इन्फ्लूएंझाच्या म्हणजेच H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून नागरिकांना आश्वासन दिलं आहे की, प्रशासनाकडून परिस्थितीवर तात्काळ बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे.
10 महत्त्वाच्या गोष्टी
1. गेल्या काही महिन्यांपासून सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, गेल्या 2-3 महिन्यांत इन्फ्लूएंझा प्रकार A च्या H3N2 उपप्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. हा सीझनल इन्फ्लूएंझा हा H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा तीव्र श्वसन संसर्ग आहे. हा संसर्ग जगभरात सर्वत्र पसरला आहे. सध्या देशातील वाढत्या श्वसन संसर्गाचं मुख्य कारण H3N2 विषाणू आहे. इन्फ्लुएंझा A (H1N1pdm09), इन्फ्लुएंझा A (H3N2) आणि इन्फ्लूएंझा बी (व्हिक्टोरिया) भारतात आढळून आले आहेत.
2. केंद्री आरोग्य मंत्रालयाच्या मते, 9 मार्चपर्यंत भारतात H3N2 आणि इन्फ्लूएंझाच्या विविध उपप्रकारांच्या एकूण 3,038 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी जानेवारीमध्ये 1245, फेब्रुवारीमध्ये 1307 आणि मार्चमध्ये 486 प्रकरणं समोर आली आहेत.
3. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात या H3N2 इन्फ्लूएंझामुळे दोन रुग्णांचा मृत्यू नोंद झाली आहे. मार्च अखेरीस या व्हायरल इन्फ्लूएंझाची प्रकरणं कमी होतील, असा अंदाज मंत्रालयाने वर्तवला आहे. या रुग्णांचं निरीक्षण केलं जात आहे. रुग्णांवर नजर ठेवली जात आहे. दरवर्षी देशात व्हायरल फ्लूचा प्रादुर्भाव जानेवारी ते मार्च या काळात शिखरावर असतो आणि पावसाळ्यानंतर हा कमी होत जातो.
4. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की, लहान मुले, वृद्ध लोक ज्यांना इतर आजार आहेत त्यांना हंगामी इन्फ्लूएंझा होण्याचा धोका जास्त असतो. कर्नाटकातील 82 वर्षीय हिरा गौडा यांचा H3N2 मुळे मृत्यू झाला असून एन्फ्लूएंझामुळे मृत्यू होणारा हा देशातील पहिला रुग्ण आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. हरियाणातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या एका 56 वर्षीय रुग्णाचा H3N2 इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाला आहे.
5. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढत्या प्रकरणांसंदर्भात आढावा बैठक घेतली. राज्यांना सतर्क राहण्यासाठी आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत संपर्कात राहून काम करत आहे आणि सर्व आरोग्यविषयक उपाययोजना करण्यास तयार आहे.
6. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज म्हणाले, "हरयाणात आतापर्यंत H3N2 विषाणूच्या 10 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नका, सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. H3N2 इन्फ्लूएंझा H1N1 सारखा नसून सौम्य संसर्ग आहे."
7. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.
8. H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
9. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे की, गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या H3N2 रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते आणि 7 टक्के रुग्णांना ICU मध्ये भरती करावं लागत आहे.
10. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोना विषाणू आणि कोविड-19 साठी लसीसंदर्भाती तज्ज्ञ समिती (NEGVAC) आज (11 मार्च रोजी) एक अंतर्गत बैठक घेऊन कोविड आणि H3N2 परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
H3N2 Virus : कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा विषाणू, स्वत:चं संरक्षण कसं कराल? वाचा सविस्तर...