(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gyanvapi Masjid सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याची छायाचित्रे समोर! हिंदू पक्षाचा दावा, शेअर केले फोटो
Gyanvapi Masjid Survey : ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी टीमला शिवलिंग सापडले, ज्याची छायाचित्रे आता समोर आली आहेत.
Gyanvapi Masjid Survey : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी टीमला शिवलिंग (Shivlinga Found In Gyanvapi Mashjid) सापडले, ज्याची छायाचित्रे आता समोर आली आहेत. हिंदू पक्षाकडून सांगण्यात आले की, नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीची तपासणी केली असता तेथे 12 फुटांचे शिवलिंग आढळले, त्यानंतर न्यायालयाने आता शिवलिंगाभोवती फिरण्यास मनाई करण्याचा आदेश जारी केला आहे.
हिंदू पक्षाकडून शिवलिंगाची छायाचित्रे शेअर
हिंदू पक्षाने शिवलिंगाची छायाचित्रे शेअर करत दावा केला आहे की, ही छायाचित्रे ज्ञानवापी मशिदीतील विहिरीतील शिवलिंगाची आहेत. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन दिवसांच्या पाहणीत घुमट ते तळघर आणि पश्चिमेकडील भिंतीची व्हिडीओग्राफी करण्यात आली असून, ते मंगळवारी न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.
12 फूट 8 इंच शिवलिंग सापडले - हिंदू पक्षाचे वकील
शिवलिंगाबाबत बोलताना हिंदू पक्षाचे वकील म्हणाले, ज्ञानवापी मशिदीच्या वाळूखानामध्ये 12 फूट 8 इंच शिवलिंग सापडले आहे. ते म्हणाले की, नंदीजींच्या समोरच शिवलिंग आहे, तिथे सर्व पाणी काढून पाहिले. वकिलाने सांगितले की, तपासादरम्यान जेव्हा शिवलिंग दिसले तेव्हा आजूबाजूचे लोक आनंदित झाले आणि त्यांनी हर हर महादेवचा नारा दिला.
"हे 1991 च्या कायद्याचे उल्लंघन" ओवेसींचा तीव्र आक्षेप
ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मशिदीच्या आत 12 फुटांचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. त्याचवेळी हिंदू पक्षाच्या या दाव्यानंतर वाराणसी न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हे 1991 च्या कायद्याचे उल्लंघन आहे, असे ओवेसी यांनी एबीपी माझाशी खास संवाद साधताना सांगितले. न्यायालयाच्या आजच्या आदेशाला मी मुस्लिमांच्या संस्थेवरील हल्ला म्हणतो, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, कनिष्ठ न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध निकाल दिला. पण SC च्या निर्णयाविरुद्ध जाण्याचा अधिकार कनिष्ठ न्यायालयाला नाही.
मुस्लिमांची बाजू न ऐकता हा निकाल
ओवेसी म्हणाले की 1991 च्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य बदलता येणार नाही. आज न्यायालयाने दिलेला हा आदेश 1991 च्या कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. दुसरे म्हणजे, सर्वेक्षण आयुक्त न्यायालयात अहवाल देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मुस्लिमांची बाजू न ऐकता हा निकाल देण्यात आला आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालास विलंब होऊ शकतो
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालात विलंब होऊ शकतो. अशा स्थितीत ज्ञानवापी मशिदीचा पाहणी अहवाल आज न्यायालयात सादर करणे अवघड जात आहे. कोर्ट कमिशनरने एबीपी न्यूजला सांगितले की, अहवाल तयार करण्यास वेळ लागेल. आज जिल्हा न्यायालयात सर्वेक्षणाचा अहवाल सादर होण्याची फारशी आशा नसल्याचे सूत्रांकडून समजते. सर्वेक्षण अहवाल तयार होण्यासाठी 2 दिवस लागू शकतात. न्यायालयाचे आयुक्त आज न्यायालयाकडे वेळ मागू शकतात. त्याचवेळी ज्ञानवापींची लढाई आता देशातील सर्वात मोठ्या न्यायालयात पोहोचली आहे.
संबंधित बातम्या
Gyanvapi Masjid सर्वेक्षणात सापडल्या स्वस्तिक, ओमच्या खुणा आणि बरंच काही! जाणून घ्या सविस्तर