(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Playoffs Scenario: ऋषभ पंतच्या दिल्लीला अजूनही प्लेऑफची संधी, पण...
Delhi Playoffs Scenario : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचलाय. दिल्लीच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत.
Delhi Playoffs Scenario : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीच्या नावावर 14 गुण जमा झाले आहेत. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचलाय. दिल्लीच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पण त्यासाठी त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. कारण, दिल्लीचा रनरेटही अतिशय खराब आहे.
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 64 सामने झालेत, पण फक्त दोन संघाला प्लेऑफचं तिकिट मिळालेय. तर तीन संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. दोन जागांसाठी पाच संघामध्ये चुरस सुरु आहे. दिल्लीने अखेरच्या साखळी सामन्यात 19 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील आशा जिवंच ठेवल्यात. पण प्लेऑफमध्ये संधी मिळणं तितकं सोपं नसेल. दिल्लीच्या नावावर 14 सामन्यात 14 गुण आहेत. त्यांचा रनरेट -0.377 इतका आहे. दिल्लीचा चौथ्या क्रमांकावर पोहचणं कठीण आहे, पण अशक्य नाही. चौथ्या क्रमांकावर पोहचण्यासाठी दिल्लीला रामभरोसे राहावं लागणार आहे. दिल्लीची सर्व मदार प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्या सामन्यावर असेल.
पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पण साखळी फेरीतील सामने अद्याप शिल्लक आहेत. पंजाबचे दोन आणि गुजरातचा एक सामना शिल्लक आहेत. पंजाब आणि गुजरात यांचा प्रत्येकी एक एक सामना सनरायजर्स हैदराबादविरोधात होणार आहे. या दोन्ही सामन्यात हैदराबादचा पराभव झाला तर दिल्लीसाठी प्लेऑफची दारं उघडली जाऊ शकतात. 16 मे रोजी गुजरात टायटन्सचा सामना हैदराबादविरोधात होणार आहे. तर पजाब किंग्सचा हैदराबादविरोधातील सामना 19 मे रोजी होणार आहे. हे दोन्ही सामने हैदराबादमध्ये होणार आहेत. हैदराबादचा दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने पराभव व्हावा, अशी दिल्लीला आशा असेल. दिल्ली आणि पंजाब संघाला हैदराबादविरोधात प्रथम फलंदाजी करावी लागेल. कारण हैदराबादचा रनरेट जबरदस्त आहे. मोठ्या धावांच्या फरकाने हैदराबादचा पराभव झाला तरच रनरेट कमी होईल. अन्यथा दिल्लीला संधी मिळणार नाही.
दिल्लीसाठी समीकरण काय -
सनरायजर्स हैदराबादचा संघ पंजाब आणि गुजरातविरोधात 100-100 धावांच्या फरकाने सामना गमावेल. तर त्यांचा रनरेट घसरेल. असं झालं तरच हैदराबादचा रनरेट दिल्लीपेक्षा कमी होईल. त्यावेळीच दिल्लीला संधी मिळणार नाही. हैदराबाद संघाचा फॉर्म पाहाता दिल्लीला प्लेऑपमध्ये पोहचण्याची संधी मिळणं शक्य दिसत नाही. पण क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही.
हैदराबादचा दोन्ही सामन्यात पराभव तर व्हावाच लागेल. त्याशिवाय आरसीबी आणि चेन्नई या सामन्याकडेही दिल्लीचं लक्ष असेल. 18 मे रोजी चेन्नईने आरसीबीचा पराभव करावा, अशी प्रार्थना दिल्लीला करावी लागणार आहे. आयपीएलच्या इतिहासात 18 मे रोजी आरसीबीचा अद्याप पराभव झालाच नाही. आता 18 मे रोजी काय होणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.