ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदाच 'झाशीच्या राणी'समोर नतमस्तक; काय सांगतो लक्ष्मीबाई आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या दुश्मनीचा इतिहास?
ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी 1857 च्या लढ्यामध्ये राणी लक्ष्मीबाईंना साथ न देता ब्रिटिशांची साथ दिली असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
ग्वाल्हेर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीचे दर्शन घेतलं आणि सर्वांच्या भूवया उंचावल्या. ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पहिलेच वंशज असतील ज्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीचे दर्शन घेतलं. सुमारे दीड शतकाहून अधिक काळात शिंद्यांच्या घराण्यातील कोणीही या समाधीचे दर्शन घेतलं नव्हतं. ही घटना आश्चर्यकारक अशीच आहे. कारण झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना मारण्यामध्ये ब्रिटिशांना ग्लाल्हेरच्या शिंदे घराण्याची मदत मिळाल्याचा आरोप करण्यात येतोय.
काय सांगतो इतिहास?
भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा अशी ओळख असलेल्या 1857 च्या उठावामध्ये ब्रिटिशांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरली असेल तर ती झाशीची लढाई. 'मर्दानी झॉंशी की राणी' असं या राणीला म्हटलं जातं. पण ही लढाई निर्णायक स्थितीमध्ये पोहोचली असताना असं काही घडलं की ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यावर गद्दारीचा ठपका बसला.
1857 च्या उठावावेळी ज्यावेळी झाशीच्या राणीने ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्याकडे मदत मागितली त्यावेळी त्यांनी तिला मदत केली नाही असं सांगितलं जातं. त्यामुळेच झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाल्या. या कारणामुळे हिंदुत्ववादी संघटना या ग्वाल्हेरच्या शिंद्यांना गद्दार अशी उपमा देतात.
शिंदे राजघराणे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या मधील या वादग्रस्त घटनेचा संदर्भ इतिहासात थेट सापडत नाही. पण कवयित्री सुभद्रा चव्हाण यांच्या एका कवितेत याचा उल्लेख आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, राणी लक्ष्मीबाईंनी शिंद्यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी ती केली नाही. त्यानंतर राणीला आपलं बलिदान द्यावं लागलं होतं. यामध्ये जयाजीराव शिंदे यांनी राणीसोबत गद्दारी केल्याचा उल्लेख आहे. असाच एक सीन 'मनकर्णिका' या चित्रपटात आहे. यामध्येही असं दाखवण्यात आलं आहे की राणी लक्ष्मीबाई या जयाजीराव शिंद्यांकडे येतात. त्या वेळी राणी लक्ष्मीबाईसोबत लढण्याऐवजी शिंदे हे या लढाईपासून अलिप्त राहतात असं दाखवण्यात आलं आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची भूमिका नेहमीच संदिग्ध अशीच राहिली आहे. शिंद्यांनी नेहमी इंग्रजांसोबत राहण्याची आणि त्यांच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचं सांगितलं जातं.
ज्योतिरादित्य शिंदे कॉंग्रेसमध्ये असताना हिंदुत्ववादी त्यांच्या घराण्यावर गद्दारीचा आरोप करायचे. आता शिंदे भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. तरीही पक्षांतर्गत विरोधक त्यांच्यावर असा आरोप करायचे. आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन या वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :