एक्स्प्लोर
राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस पत्ते खोलणार, महात्मा गांधींच्या नातवाला मैदानात उतरवणार?

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत. एनडीएचा उमेदवार कोण असणार याबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे. पण आज पहिल्यांदाच यूपीएकडून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याचं समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्लिश वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिल्यानं राजधानीतली हवा पुन्हा गरम झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीए महात्मा गांधींच्या नातूंना उतरवण्याच्या तयारीत आहे का? इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानंतर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. महात्मा गांधींचे नातू आणि बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी हे यूपीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वत: गोपाळकृष्ण गांधी यांनीच यासंदर्भातली प्राथमिक चर्चा राजकीय पक्षांनी आपल्याशी केल्याचं मान्य केलं आहे. अर्थात ही प्राथमिक स्तरावरचीच चर्चा आहे. पण तरीही या निमित्तानं यूपीएचे पत्ते नेमके कुठल्या दिशेनं पडत आहेत हे समोर आलं आहे. राष्ट्रपतीपदाबद्दल एनडीएचा उमेदवार कोण असेल यावरुनच यूपीएची रणनीती ठरणार आहे. त्यामुळेच इतक्यात नाव जाहीर करण्याची घाई केली जाणार नाहीय. पण जर भाजपकडून संघाशी निगडीत एखादं नाव समोर आलं, तर त्याला चोख उत्तर म्हणून गांधीचे नातू म्हणून गोपाळकृष्ण गांधी यांना उभं केलं जाईल. आकड्यांच्या लढाईत यूपीएनं ही लढाई हारली तरी या लढाईला एक प्रतिकात्मक अर्थ देण्याचा यूपीएचा प्रयत्न आहे. गोपाळ गांधींसोबतच लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांच्याही नावाची चर्चा आहे. जर एनडीएनं झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढं केलंच तर कदाचित त्यांना उत्तर देण्यासाठी मीरा कुमार यांनाही मैदानात उतरवलं जाऊ शकतं. गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची सर्वाधिक पसंती आहे. शिवाय तृणमूलशी विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले डावेही या नावावर त्यांची साथ द्यायला तयार आहेत. कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?
- महात्मा गांधींचे सर्वात लहान पुत्र देवदास गांधी यांचे पुत्र आहेत गोपाळकृष्ण
- 72 वर्षाच्या गोपाळकृष्ण यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलेलं आहे
- 1992 ला स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतरही अनेक महत्वाच्या पदांवर काम
- 2004 ते 2009 या यूपीएच्या काळात ते बंगालचे राज्यपालही होते
- नंदीग्राममधल्या हिंसेचा उघड निषेध केल्यानं बौद्धिक वर्तुळात आदर
- विक्रम सेठ यांच्या ‘सुटेबल बॉय’ या कादंबरीचं हिंदी भाषांतर
- औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह याच्यावर त्यांनी एक नाटकही लिहिलंय.
आणखी वाचा























