Ganesh Chaturthi 2022: ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ब्रिटीश उच्चायुक्तांकडून खास मराठीत शुभेच्छा!
Alex Ellis : ‘गणेश चतुर्थी’च्या सर्वांना शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’, असे म्हणत त्यांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत फोटो शेअर केला आहे.
Ganesh Chaturthi 2022, Alex Ellis : आज देशभरात सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2022) धूम आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गणपतीच्या निमित्ताने सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ म्हणत सगळीकडेच गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी आज मंगलमूर्ती श्रीगणेशाचं (Ganesh Chaturthi 2022 ) आगमन झालं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा तब्बल 2 वर्षांनंतर सगळीकडे जल्लोषाचा माहोल पाहायला मिळत आहे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स इलिस (Alex Ellis) यांनीही खास मराठीत ट्विट करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘गणेश चतुर्थी’च्या सर्वांना शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’, असे म्हणत त्यांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत फोटो शेअर केला आहे.
पाहा पोस्ट :
ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स इलिस नेहमीच भारतीय संस्कृतीचे कौतुक करताना दिसतात. ‘गोकुळाष्टमी’च्या निमित्ताने त्यांनी नुकतीच इस्कॉन मंदिरालाही भेट दिली होती. त्यावेळीही त्यांनी सगळ्या भारतीयांना कृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, शुभ प्रसंगी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेताना सन्मानित झाल्यासारखे वाटते, असे त्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी देखील संवाद साधला होता. यावेळी देखील त्यांनी चक्क हिंदीमध्ये संवाद साधला होता.
गणेशोत्सवाचा जल्लोष
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच लाडक्या गणपती बाप्पाचे आज आगमन झाले आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान झाले आहेत. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या या उत्सवाला सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष सगळीकडेच ऐकायला मिळणार आहे.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर
यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. मात्र, कोरोनानंतर आता नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे. देशातच नव्हे तर, परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी देखील गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: