(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2022 : पुण्यातील ढोल ताशा पथकांचा इतिहास; कोणी केली सुरुवात? प्रसिद्ध ढोल पथकं कोणती? जाणून घ्या...
जाणून घेऊयात प्रसिद्ध ढोल ताशा पथकं आणि त्यांचा इतिहास...
Ganesh Chaturthi 2022 : लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आज (31 ऑगस्ट) झाले आहे. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' अशा जयघोषात गणेशाचं स्वागत केलं जात आहे. बाप्पाच्या आगमनानं सगळीकडे आज उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजिक गणेशोत्सवांच्या गणपतींचे आगमन देखील झाले आहे. मंडळ्यांच्या बाप्पाचे आगमन हे मोठ्या मिरवणुकीनं होते. या मिरवणुकीमध्ये ढोल ताशाचे वादन केले. जाते. ढोल ताशाच्या तालावर अनेक लोक ठेका देखील धरतात. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये अनेक ढोल ताशा पथकं आहेत, जे गणेशोत्सवामध्ये वादन करतात. जाणून घेऊयात प्रसिद्ध ढोल ताशा पथकं आणि त्यांचा इतिहास...
अप्पासाहेब पेंडसे यांनी केली सुरुवात
अप्पासाहेब पेंडसे या नावाने प्रसिद्ध असलेले डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे यांनी, पुण्यात स्थापन केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशाला या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोल-ताशा पथकाला सुरुवात केली. 1965 मध्ये गणेशोत्सवात दंगल झाली होती आणि पोलिसांनी मिरवणुकीत वाद्ये वाजवण्यास मनाई केली होती. पोलिसांच्या या निर्णयाचा विरोध आप्पासाहेबांनी केला. गळ्यात ताशा घेऊन लक्ष्मी रोडच्या चौकात उभे राहून ते वाजवू लागले. त्यावेळी लोकांनी अप्पासाहेबांना पाठिंबा दिला होता. 1975 मध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेतच मुलींच्या पहिल्या ढोल पथकाची सुरुवात झाली.
पुण्यातील प्रसिद्ध ढोल ताशा पथक
ज्ञान प्रबोधिनीनंतर अनेक शाळांनी त्यांच्या ढोल पथकांची स्थापना केली. विमलाबाई गरवारे प्रशाला, नूतन मराठी विद्यालय प्राशाला आणि रमणबाग प्रशाला या शाळांनी देखील ढोल पथकांची स्थापना केली. आज पुण्यात अनेक प्रसिद्ध ढोल ताश पथकं आहेत. शिवमुद्रा, शिवगर्जना, श्रीराम, परशुराम, शौर्य, नादब्रह्म, रुद्रगर्जना, कलावंत यांसारखे ढोल पथक दर वर्षी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल ताशांचे वादन करतात. 2 ऑक्टोबर 1999 रोजी समर्थ प्रतिष्ठान या ढोल पथकाची स्थापना झाली. तर शिवगर्जना या ढोलपथकाची सुरुवात 2002 मध्ये झाली. कलावंत हे पुण्यातील प्रसिद्ध ढोल ताशा पथक आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार ढोल आणि ताशाचे वादन करतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Pune Manache Ganpati : पुण्यातील मानाच्या गणपतींचा मान कुणी घालून दिला? क्रम कसा ठरला?
- Ganesh Chaturthi 2022 LIVE Updates : सुखकर्ता... दुखहर्ता... दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग