(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh festival 2022 : गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा सजल्या, फुल विक्रेत्यांसह मूर्ती व्यावसायिकांना मिळतोय चांगला प्रतिसाद
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा (Market) चांगल्याच सजल्या आहेत. गणपतीच्या पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे.
Ganesh festival 2022 : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) आज घरोघरी आगमन होत आहे. या गणशोत्सवाचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा (Market) चांगल्याच सजल्या आहेत. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. या उत्सवाच्या काळात विक्रेत्यांना चांगला फायदा होत असतो. कारण या काळात मोठ्या प्रमाणावर फुलांना तसेच गणपतीच्या आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांना मोठी मागणी असते.
या गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र बाजारपेठेत उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारेपठा सजल्या आहेत. विक्रेत्यासंह ग्राहक उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळं गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात गणोत्सव साजरा कर्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सर्वच मंडळांनी केली आहे. दरम्यान, या गणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने काही फुल विक्रेत्यांसह गणेश मूर्ती विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत.
फुलांचे दर वाढले
आज गणेश चतुर्थी निमित्त दादरच्या फुल मार्केटमध्ये मोठी लगबग पाहायला मिळत आहे. यावेळेस फुलांची विक्रीत गेल्यावर्षी पेक्षा 40 टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती फुल विक्रेते महेश भालेराव यांनी दिली आहे. बाजारात सध्या झेंडूच्या फुलांचे दर हे 40 ते 100 तर शेवंती 60 ते 200 कानेर 600 प्रति किलो आहेत. याचा चांगलाच फायदा विक्रेत्यांना होत असल्याचे दिसत आहे.
गणेश मूर्ती खरेदीला चांगला प्रतिसाद
यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळं नागरिक मोठ्या उत्साहात सण, समारंभ साजरा करत आहेत. सरकारनं देखील नियम शिथील केले आहेत. त्यामुळं यावेळी लोकांचा गणेशाच्या मूर्ती खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाडू मुर्तीच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला असल्याची माहिती पुण्यातील श्री गणेश कला केंद्राचे प्रमुख मूर्ती विक्रेते सागर शिरोडकर यांनी दिली. मागील वर्षीपेक्षा यावर्षी शाडू मूर्तीच्या विक्रीत 30 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती देखील शिरोडकर यांनी दिली. पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे ते म्हणाले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळं आम्हाला फायदा होत आहे. तसेच पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची खरेदी होत असल्यामुळं लोकांना घरीच गणपतीचे विसर्जन करता येमार असल्याचे शिरोडकर म्हणाले. तसेच यावेळी पूजा साहित्य खरेदीला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पूजा साहित्याबरोबर मी आरती संग्रह, अथर्व शिर्ष पुस्तके फ्रि देत असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली. पुण्यात पाच ठिकाणी श्री गणेश कला केंद्र नावाने दुकाने असल्याचे शिरोडकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: