coronavirus | फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट, पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा
फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सर्व हॉस्पिटल भरलेली आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. या परिस्थितीत राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रोन यांनी एक महिन्याच्या कालावधीसाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
पॅरिस: फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रोन यांनी बुधवारी (28 ऑक्टोबर) पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात कोरानाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण या काळात शाळा आणि काही कामाची ठिकाणे खुली राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा नवीन लॉकडाऊन महिन्याभराच्या काळासाठी असेल असेही त्यांनी सांगितले.
सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या संक्रमणामुळे देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. त्याला आळा घालण्यासाठी फ्रान्समध्ये या आठवड्यापासून पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात येणार आहे असे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रोन यांनी बुधवारी देशाला संबोधन करताना सांगितले.
"फ्रान्सवर कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असेल" असे इमॅन्युअल मँक्रोन यांनी त्यांच्या संबोधनात म्हटले आहे.
मंगळवारी एकाच दिवसात कोरोनामुळे 520 रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण घालायचे असेल तर शुक्रवारपासून देशात लागू होणारा लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या काळात फ्रान्समधील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व हॉटेल्स, बार आणि उद्योगधंदे शुक्रवारपासन बंद राहतील. इमॅन्युअल मँक्रोन यांनी लोकांना असेही आवाहन केलंय की, "लोकांनी आपली कामे न थांबवता घरातून वा रिमोट प्रदेशातून आपापली कामे करावीत. पण जर घरातून काम करणे शक्य नसेल, तसे कंपन्यांनी कळवले तर अशा कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास परवानगी असेल." "या काळात नर्सिंग होम आणि स्मशाने खुली राहतील," असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे सर्व नियम सरकार गुरुवारी स्पष्ट करेल.
फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही 35,785 वर पोहोचली असून त्याबाबतीत फ्रान्सचा जगात सातवा क्रमांक लागतो. सध्याच्या परिस्थितीत फ्रान्समधील सर्व हॉस्पिटले ही कोरोनाच्या रुग्णांनी भरलेली आहेत, आता नव्या रुग्णांना बेड मिळणे कठीण होत आहे.
या आधी फ्रान्समधील पॅरिस आणि मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लावण्यात आली होती. पण या उपायाचा काही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे प्रशासनाने फ्रान्स सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची शिफारस केली होती.
महत्वाच्या बातम्या: