मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता संपत आहे. त्यामुळे सिद्धार्थ कुंकळ्येकर हे उद्या अर्ज सादर करतील.
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांना बाजूला ठेवून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पणजीचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रदेश भाजपने पणजी मनपामधील भाजप नगरसेवक, पणजी भाजप मंडळ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर राज्य निवडणूक समितीने सिद्धार्थ आणि उत्पल यांची नावे केंद्रीय समितीला कळवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी येथील कार्यक्रमामध्ये केंद्रीय नेते व्यस्त असल्याने पणजीच्या उमेदवाराची निवड लांबली होती. अखेर आज दुपारी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सिध्दार्थ कुंकळ्येंकर हे पणजी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले आहेत.
उमेदवारी जाहीर होताच कुंकळ्येकर यांनी पणजीमधील राजकीय नेत्यांशी संवाद साधून पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता संपत आहे. त्यामुळे सिद्धार्थ कुंकळ्येकर हे उद्या अर्ज सादर करतील.