अमित शाह ते येडियुरप्पा, भाजपचे पाच बडे नेते एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. केवळ अमित शाहच नाही तर काल दिवसभरात भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, रविवारी (2 जुलै) भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. तर यूपीच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचं रविवारी निधन झालं.
रविवारी कोणकोणत्या भाजप नेत्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह?
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."
बनवारीलाल पुरोहित, तामिळनाडूचे राज्यपाल
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्यपालांच्या संपर्कात जे लोक आले होते त्यांचीही कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत कावेरी हॉस्पिटलने मेडिकल बुलेटीनही जारी केलंय. पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून असल्याचंही हॉस्पिटलने म्हटलं आहे.
बी एस येडियुरप्पा, कर्नाटकचे मुख्यमंत्री
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मला कोरोनाची लागण झाली असून तब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वॉरन्टाईन करावं," असं आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलं आहे.
स्वतंत्र देव, यूपीचे भाजप प्रदेशाध्यक्ष
उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार ते घरीच क्वॉरन्टाईन झाले आहेत. त्यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. काही लक्षणांमुळे शनिवारी कोरोना चाचणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही स्वत:ला क्वॉरन्टाईन करावं आणि गरजेनुसार कोरोना चाचणी करावी अशी मी विनंती करतो, असं स्वतंत्र देव यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
महेंद्र सिंह, यूपीचे कॅबिनेट मंत्री
यासोबतच उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लखनौमधील एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लखनौ दौऱ्याच्यावेळी महेंद्र सिंह त्यांच्यासोबत होते, शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
यूपीच्या कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू
दरम्यान, रविवारी (2 ऑगस्ट) उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचं निधन झालं होतं. लखनौमधील एसपीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमला राणी या उत्तर प्रदेशच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होत्या. घाटमपूर मतदारसंघाच्या त्या आमदार होत्या. त्यांना 18 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या
- Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
- अमित शाहांना कोरोनाची लागण, राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं...