(Source: ECI/ABP News/ABP Majha)
32 वर्षांपूर्वीही एका शेतकरी आंदोलनानं दिल्लीला भरवली होती धडकी
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीच्या 32 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागा झाल्या आहेत. त्यावेळीही असंच दिल्लीला धडकी भरवणारं आंदोलन झालं होतं.
नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांचं वादळ येऊन धडकलं आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस..सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर दिल्लीच्या पाच प्रमुख एन्ट्री पॉईंटसवर पूर्ण नाकेबंदी करु असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे दिल्लीच्या 32 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागा झाल्या आहेत. त्यावेळीही असंच दिल्लीला धडकी भरवणारं आंदोलन झालं होतं.
शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं होतं. बाबा टिकैत या नावानं ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. 2 ऑक्टोबर 1988 रोजी देशभरातले शेतकरी त्यांच्या नेतृत्वात दिल्लीतल्या इंडिया गेट समोरच्या बोट क्लबवर जमा झाले होते. त्यानंतर 7 दिवस या शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्यांसह इथेच तळ ठोकला होता. त्यावेळी राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान होते. शेतीसाठी लागणाऱ्या वीज आणि पाणी बिलात कपात व्हावी, पिकांचे दर योग्य ठरावेत यासह एकूण 35 कलमी अजेंडा या आंदोलनाचा होता. 14 राज्यांतले जवळपास 5 लाख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी इंडिया गेट समोरच्या हिरवळीतल्या बोट क्लबवर आंदोलनांना परवानगी असायची. पोलीस यंत्रणांना न जुमानता एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्रित झाला होता. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी तेव्हा गोळीबारही केला, ज्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतकरीही उग्र झाल्यानं शेवटी पोलिसांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता. सात दिवस हे शेतकरी डेरा टाकून बसल्यानंतर पुन्हा 30 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी लाठीमार करुन या शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी काही मागे हटले नव्हते.
प्रधानमंत्रीने दुश्मन जैसा व्यवहार किया है, किसानों की नाराजगी उन्हे महंगी पडेगी अशी गर्जना त्यावेळी महेंद्रसिंह टिकैत यांनी सभेत केली होती. अखेर टिकैत यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ तयार करुन त्यांची राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांशीही चर्चा घडवून आणली गेली. नंतर पंतप्रधान राजीव गांधी यांनाही शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य करत असल्याचं सांगतच हे आंदोलन मिटवावं लागलं होतं. त्यामुळे आता ज्यावेळी इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी दिल्लीत धडकतायत त्यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का याची चर्चा सुरु आहे.
संबंधित बातम्या :