खाद्यतेल महागलं; किंमतीत 20 टक्यांनी वाढ, डाळींच्याही किंमती महागल्या
गेल्या महिन्याभराच्या कालावधीत खाद्यतेलाच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमतीमुळे देशातील किंमती वाढल्याचं भारतीय उद्योग मंडळाने सांगितलं आहे.
नवी दिल्ली : आधीच इंधन दरवाढीने नागरिक हैराण झालेले असताना आता खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दराने सामान्यांचं कंबरडं मोडलंय. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती या देशातील खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचं भारतीय उद्योग मंडळाने सांगितलं आहे.
एकीकडे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली असताना दुसरीकडे डाळीच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या रिटेर बाजारपेठेत डाळीच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून या किंमती आतापर्यंतच्या सर्वात जास्त असल्याचं सांगण्यात येतंय.
खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये 15 ते 20 रुपयांची वाढ
दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादन कमी झाले होते तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. त्यात मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने आता आयातीवरील कर कमी केले तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च पण वाढला हे ही एक कारण आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगार, वेतन कपात झालेल्या नागरिकांना आता महागाईचे हे चटके नकोसे झाले आहेत. महागाईवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असाच प्रश्न त्यांना पडला असून लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष घालावे आणि दिलासा द्यावा अशीच मागणी सर्वसामान्य करत आहे. इंधन दरवाढ, आयातीवरील कर आणि कमी उत्पादन या कारणांमुळे किराणा मालाचे भाव वाढल्याचं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन होईल या भिती आणि अफवेमुळे तर महागाई भडकली नाही ना ? अशीही शंका आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane : उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात तेव्हा गुन्हा होत नाही का? अटकेच्या वृत्तावर राणेंचा शिवसेनेला प्रतिसवाल
- India Corona Updates : देशात गेल्या 24 तासात 25,467 नव्या रुग्णांची नोंद, 354 जणांचा मृत्यू
- Covid Vaccine : देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक