Covid Vaccine : देशातील 1.6 कोटी लोकांना वेळेत दुसरा डोस नाही, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक
Covid Vaccine : कोरोना लसीच्या पहिल्या डोस नंतर 16 आठवड्यांच्या आत देशातील किमान 1.6 कोटी लोकांना दुसरा डोस मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम जोरात सुरु असल्याचं केंद्र सरकार सांगतंय. पण लसीचा पहिला डोस घेतलेल्या 1.6 कोटी लोकांना त्यांचा दुसरा डोस वेळत मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भरणा असल्याची माहितीही मिळतेय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 58.82 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यामधील पहिला डोस घेतलेल्या किमान 1.6 कोटी लोकांना 16 आठवड्यांच्या आत दुसरा डोस मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. उरलेल्या नागरिकांमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे.
या दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डींनी सांगितलं की, देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये गती आणण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. कोरोना लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार परदेशातून जास्तीत जास्त कच्चा माल उपलब्ध करुन देण्यावर भर देत आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसून नव्या रुग्णांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाची 25 हजार 467 नव्या रुग्णांची भर पडली असून 354 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 39 हजार 486 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 25,072 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane : नारायण राणेंना अटक होणार? मुख्यमंत्र्यांबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अटक करण्याचे नाशिक पोलिसांचे आदेश
- Alexa बोलणार आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात, अॅमेझॉनची नवी सेवा लॉन्च
- गृहमंत्रालयाचा अजब जीआर; पोलिसांना आपल्या मुलाला भरती करायचं असेल तर 35 व्या वर्षी जन्म द्यावा लागेल का?