(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mughal Garden : आजपासून पर्यटकांसाठी दिल्लीतील मुघल गार्डन खुले, पाहा काय आहेत नियम
राष्ट्रपती भवन परिसरात प्रसिद्ध असणारे ऐतिहासीक मुघल गार्डन आजपासून खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना हे ऐतिहासीक गार्डन पाहता येणार आहे.
Mughal Garden Open : दिल्लीच्या राष्ट्रपती भवन परिसरात प्रसिद्ध असणारे ऐतिहासीक मुघल गार्डन आजपासून (12 फेब्रुवारी) खुले करण्यात आले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मुघल गार्डन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना हे ऐतिहासीक गार्डन पाहता येणार आहे. हे गार्डन 16 मार्चपर्यंत पाहण्यासाठी पर्यटकांना खुले असणार आहे. याबबात राष्ट्रपती भवनाकडून एक निवदेन देखील जारी करण्यात आले होते.
सोमवार वगळता दररोज मुघल गार्डन उघडणार
प्रसार भारतीच्या ट्विटरवरही या संदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. मुघल गार्डन सोमवार वगळता दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. 16 मार्चपर्यंत ते खुले राहणार आहे. आगाऊ ऑनलाइन बुकिंगद्वारेच उद्यानाला भेट देण्यासाठी पर्यटकांना परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून मुघल गार्डन बंद करण्यात आले होते.
तिकीट कसे बुक करावे
मुघल गार्डनसाठी तिकीट बुक करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तिकीट बुकिंगदरम्यान स्लॉट निवडून त्यामध्ये तुमचे नाव आणि इतर वैयक्तिक तपशील भरावे लागणार आहेत.
मुघल गार्डनबद्दल इतर तपशील
आधीच बुक केलेले 7 तासांचे स्लॉट सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
अंतिम प्रवेश दुपारी 4 वाजेपर्यंत होईल.
प्रत्येक स्लॉटमध्ये जास्तीत जास्त 100 लोक मुघल गार्डनला भेट देऊ शकतात.
भेटीदरम्यान, अभ्यागतांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.
अभ्यागतांना प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग देखील करावे लागेल.
नो मास्क, नो एंट्री.
राष्ट्रपती इस्टेटच्या गेट क्रमांक 35 मधून प्रवेश आणि बाहेर पडता येईल.
प्रवासादरम्यान अभ्यागतांना मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी असेल.
अभ्यागतांना पाण्याच्या बाटल्या, ब्रीफकेस, हँडबॅग, कॅमेरा, रेडिओ, छत्री आणि खाद्यपदार्थ आणू नयेत, असे सांगण्यात आले आहे.
मुघल गार्डनमध्ये अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रथमोपचार, वैद्यकीय सुविधा, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले होते. यावेळी मुघल गार्डनही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रपती भवनात असलेले मुघल गार्डन 15 एकर परिसरात पसरले आहे. मुघल गार्डनची वैशिष्ट्यं म्हणजे जम्मू काश्मीरातील मुघल गार्डनच्या धर्तीवर सर एडविन ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनात मुघल गार्डनची निर्मिती केली. राष्ट्रपती भवनाचा आत्मा, असे याचे वर्णन केले जाते. मोठ्या आयताकृती बागेतील सुंदर आणि शोभिवंत झाडे आणि वनस्पतींसह कारंजावरील रंगीबेरंगी फुलांचे गालिचे येथे येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतात.