(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Yaas : तोक्तेच्या संकटातून सावरत नाही तोच आणखी एका चक्रीवादळाच्या अफवांना उधाण
तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरायला होत नाही, तोच आणखी एक चक्रीवादळ देशावर आदळण्याच्या चर्चांनी जोर धरला
Cyclone Yaas तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरायला होत नाही, तोच आणखी एक चक्रीवादळ देशावर आदळण्याच्या चर्चांनी जोर धरला आणि अनेकांना धडकीच भरली. अंफान या चक्रीवादळापेक्षाही अधिक शक्तिशाली असं Cyclone Yaas बंगालच्या दिशेनं घोंगावत येत असून, 23 ते 25 मे पर्यंत हे वादळ धडकणार असल्याच्या वृत्तांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पण, स्थानिक हवामान संस्थेनं या अफवा असल्याचं सांगत चक्रीवादळाच्या वृत्तांचं खंडन केलं.
सध्याच्या क्षणी आम्ही फक्त या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं वृत्त जाहीर केलं आहे. हा कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्याकडे असणाऱ्या बंगालच्या उपगासागरात आणि त्यानजीकच्या परिसरात 23 मे ला प्रभाव दाखवू शकतो. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Cyclone Yaas (yash) चक्रीवादळाचा चुकीचा उल्लेख करत तो अंफानहून अधिक तीव्र असण्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. मेटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील फोटो आणि वृत्तांपासून नागरिकांनी सावध रहावं असं आवाहन करण्यात येत आहे.
काही हवामानतज्ज्ञांच्या मते चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी हवामानातील काही घटक कारणीभूत ठरतात. त्यामुळं सध्या चक्रीवादळ कुठे सुरु होऊन त्याचा लँडफॉल नेमका कुठे असणार आहे याविषयी आतापासूनच तर्क लावणं चुकीचं ठरेल. त्यामुळे तूर्तास कोणत्याही चक्रीवादळाचा धोका नसल्याचंच हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.