FM Nirmala Sitharaman: देशात कनेक्टिव्हिटी सुविधा होणार अधिक चांगली, 1.34 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम सुरू
FM Nirmala Sitharaman: केंद्र सरकार 1.34 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ईशान्येकडील अनेक रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क प्रकल्प राबवत आहे.
FM Nirmala Sitharaman: केंद्र सरकार 1.34 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ईशान्येकडील अनेक रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क प्रकल्प राबवत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी ही माहिती दिली. सीतारामन म्हणाल्या की, "आम्ही 2,011 किमी लांबीच्या आणि 74,000 कोटी रुपये खर्चाच्या 20 रेल्वे प्रकल्पांवर काम करत आहोत,"
4 हजार किमी लांबीचा रस्ता विकसित करण्यात येणार
सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकार ईशान्य प्रदेशातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. याशिवाय, केंद्र सरकार या प्रदेशात एकूण 58,000 कोटी रुपये खर्चून 4,000 किमीचे रस्ते विकसित करत आहे, असे त्या म्हणाल्या.
15 हवाई जोडणी प्रकल्पही सुरू आहेत
त्या म्हणाल्या की, ईशान्येत सुमारे 2,200 कोटी रुपयांचे 15 हवाई कनेक्टिव्हिटी प्रकल्प देखील सुरू आहेत. मात्र, हे प्रकल्प कधी पूर्ण होतील, हे अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही.
8 वर्षांत चांगली कनेक्टिव्हिटी सुविधा देण्यासाठी केले प्रयत्न
सीतारामन म्हणाल्या की, “सरकार पुढे गंगावरील राष्ट्रीय जलमार्ग-1, ब्रह्मपुत्रेवरील राष्ट्रीय जलमार्ग-2 आणि बराकवर राष्ट्रीय जलमार्ग-16 विकसित करत आहे. गेल्या सात-आठ वर्षांत, आम्ही चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे,” त्या म्हणाल्या, आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या आजूबाजूच्या सादिया आणि धुबरी दरम्यानचा संपूर्ण भाग उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी विकसित केला जात आहे. आम्ही गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रेवर मल्टी-मॉडॅलिटी सेंटर बांधत आहोत. यामध्ये पांडू येथील जहाज दुरुस्ती बंदर, चार पर्यटक फेरी आणि 11 तरंगत्या टर्मिनलचा समावेश आहे.
सरकार ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीवरही भर देत आहे
सीतारामन म्हणाल्या की, ईस्टर्न वॉटरवेज कनेक्टिव्हिटी ट्रान्सपोर्ट ग्रिड पूर्ण झाल्यानंतर, ते केवळ ईशान्य आणि उर्वरित भारतादरम्यानच नव्हे तर उपखंडातही अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास सक्षम असेल. यामध्ये 5 हजार किमीचा जलमार्ग देण्यात येणार आहे. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार ईशान्य प्रदेशात वीज आणि मोबाइल नेटवर्क, 4G आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून अनेक प्रकल्प विकसित करत आहे.