Coronavirus | देशात कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार; आतापर्यंत 2549 रुग्णांचा मृत्यू
देशातील कोरोना बाधितांचा आकडा 78 हजारांच्या पार पोहोचला आहे. तर 2549 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशात जीवघेणा कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या व्हायरचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 78 हजार पार पोहोचली आहे. आतापर्यंत 78 हजार 03 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 2549 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 26235 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मागील 24 तांसांमध्ये 3722 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 134 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या राज्यात किती मृत्यू?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये 975, मध्यप्रदेशमध्ये 232, गुजरातमध्ये 566, दिल्लीमध्ये 106, तामिळनाडूमध्ये 64, तेलंगणामध्ये 34, आंध्रप्रदेशमध्ये 47, कर्नाटकात 33, उत्तर प्रदेशमध्ये 83, पंजाबमध्ये 32, पश्चिम बंगालमध्ये 207, राजस्थानमध्ये 121, जम्मू-काश्मीरमध्ये 11, हरियाणामध्ये 11, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, बिहारमध्ये 7, ओडिशामध्ये 3, आसाममध्ये 2, हिमाचल प्रदेशमध्ये 2, मेघालयमध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
10 मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून कोरोना बाधितांची संख्या 26 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून एकूण कोरोना बाधित 9267 रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून 9227, राजधानी दिल्लीमध्ये 7998, राजस्थानमध्ये 4328, मध्यप्रदेशमध्ये 4173, उत्तरप्रदेशमध्ये 3729, आंध्रप्रदेशमध्ये 2137, तेलंगणामध्ये 1367 आणि बिहारमध्ये 940 कोरोना बाधित आहेत.
पाहा व्हिडीओ : एमपी आणि यूपीत मजुरांवर काळाचा घाला, दोन अपघातात 13 मजुरांचा मृत्यू
केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेचा कुणाला कसा फायदा मिळणार याची सविस्तर माहिती दिली.ऑगस्ट महिन्यापर्यंत कंपनी आणि कर्मचार्यांचा 12 टक्के + 12 टक्के पीएफमध्ये केंद्र सरकार जमा करणार आहे. याचा 75 लाखाहून अधिक कर्मचारी व कंपन्यांना फायदा होणार आहे. सरकारने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही यामध्ये हातभार लावला होता. हीच सुविधा आता तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
कोरोनाच्या संकटात कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी खासगी कंपन्याना 12 टक्क्यांएवजी 10 टक्के पीएळ भरावा लागणार आहे. ऑगस्टपर्यंत सरकार हे पीएफ भरणार आहे. ज्या कंपन्यांकडे 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, तसेच 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना सरकारच्या या योजनेचा फायदा होणार आहे. म्हणजेच 15 हजाराहून अधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. यामध्ये जवळपास 3,67,000 कंपन्यांना आणि 72,22,000 कर्मचार्यांना याचा फायदा होईल. यावर सरकार 2500 कोटी खर्च करणार आहे.
संबंधित बातम्या :