Covid 19 Updates: परदेशातून विमानाने येणाऱ्या रॅन्डम प्रवाशांची चाचणी होणार, केंद्रीय आरोग्य सचिवांचे विमान उड्डाण सचिवांना पत्र
केंद्रीय आरोग्य सचिवांनी केंद्रीय विमान उड्डाण सचिवांना पत्र लिहिलं आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग करीता पाठवावे अशी सूचना त्यात करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: चीनसह जगभरातील इतर देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना भारतात त्यासंबंधी आता खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी नागरी हवाई उड्डाण सचिवांना एक पत्र लिहिलं आहे. त्यानुसार प्रत्येक फ्लाईटमधून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची आता विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. या चाचणीसाठी रॅन्डम प्रवाशांची निवड एअरलाइन्स ऑपरेटरच करणार आहेत. जपान, दक्षिण कोरिया, फ्रांस, ब्राझील आणि चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं केंद्रीय आरोग्य सचिवांनी हे पत्र लिहिलं आहे.
ज्या प्रवाशांची तपासणीसाठी निवड करण्यात येईल त्या प्रवाशांनी आपले नमुने दिल्यानंतर त्यांना विमानतळ सोडण्याची परवानगी असेल. पॉझिटिव्ह असलेल्या नमुन्यांची माहिती प्रयोगशाळेनं एनसीडीसीला देखील द्यावी आणि राज्य सरकारांना देखील त्याबाबतीत सूचित करण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग करीता पाठवावे अशीही सूचना त्यामध्ये देण्यात आली आहे. 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ही व्यवस्था विमानतळांवर कार्यान्वित केली जाणार आहे.
कोव्हिड चाचणी प्रक्रिया नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर माफक दरात उपलब्ध करण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या पत्रातून विनंती केली आहे.
बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत कुठल्याही सक्तीच्या नियमांची घोषणा करण्यात आली नाही. पण मास्कच्या वापरासह कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्याच आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच राज्यांनी जिनोम सिक्वेंसिग आणि कोरोना टेस्ट वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Covid 19 Updates: राज्यांनी अलर्ट राहावं, मोदींची सूचना
सर्व राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करत रुग्णालयं सज्ज ठेवावीत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींच्या लसीकरणावर भर द्या असंही ते म्हणाले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणीही मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं.
आजच्या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ कमी असली तरीही जगभरात मात्र ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.