आणखी एक स्वदेशी लस लवकरच येणार, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या 30 कोटी लसीसाठी केंद्र सरकारने दिले 1500 कोटी रुपये
Corona Vaccination : कोरोनाची लस निर्माण होण्याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बायोलॉजिकल-ई कंपनीचे 30 कोटी डोस बुक केले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने 1500 कोटी रुपये आगाऊ रक्कम दिली आहे.
नवी दिल्ली : हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारेन दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायल मध्ये आहे.
बायोलॉजिकल-ई कंपनीचे डोस ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तयार होणार असल्याची माहिती आहे. सध्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेज मध्ये आहे. या आधीच्या दोन फेजमध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत. बायोलॉजिकल-ई कंपनीकडून तयार करण्यात येणारी लस ही आरबीडी प्रोटिन सब-युनिट लस असून येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.
भारत सरकारकडून स्वदेशी लस निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना संशोधन आणि विकासाच्या कार्याला भारत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. बायोलॉजिकल-ई या कंपनीच्या लसीसाठी भारत सरकारकडून प्री क्लिनिकल ट्रायलपासून स्टेज तीनच्या अभ्यासापर्यंत मदत करण्यात आली आहे. या कंपनीला 100 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत करण्यात आली असून इतरही प्रकारची सर्व मदत सरकारकडून करण्यात आली आहे.
सध्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा लसीकरणाच्या कार्यक्रमात वापर केला जात आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही ची आयात करण्यात आली असून ती लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन लस फायझरच्या वापरालाही या महिन्यापर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- यंदा सुद्धा 'शिवराज्याभिषेक घराघरात' साजरा करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन
- 'ते' ट्वीट शिवसैनिकाकडून चुकून टाकलं गेलं; आक्षेपार्ह्य ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण
- देशातल्या प्रत्येक पत्रकाराला केदारनाथ निवाड्याचं घटनादत्त संरक्षण, विनोद दुवा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण