Constitution Day | 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा का केला जातो? इतिहास आणि महत्व
19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.
मुंबई : देश आज संविधान दिवस साजरा करत आहे. देशभरात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचा स्वीकार करुन 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. याच दिवशी संविधानाने तो स्वीकारला. 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाची भूमिका
'संविधान दिवस' एकप्रकारे देशाचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्याचंही प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
खरंतर संविधानाच्या बाबतीत असं बरंच काही आहे जे आपल्याला माहित हवं. पण संविधानातील आणि संविधानाच्या संदर्भातील काही प्रमुख तथ्ये जाणून घेऊया.
1. भारताचं संविधान डिसेंबर 1946 ते डिसेंबर 1949 दरम्यान तयार करण्यात आलं. हा अतिशय आव्हानात्मक काळ होता. कारण धार्मिक दंगल, जातीभेद आणि स्त्री-पुरुष असमानता देशाच्या सार्वभौमत्वाला धोक्यात टाकत होती.
2. भारतीय राज्यघटना मूलभूत राजकीय तत्त्वे स्पष्ट करणारी चौकट आखून देते. सरकारी संस्थांची रचना, प्रक्रिया, अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करते. तसंच नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशांची तत्त्वे आणि कर्तव्ये ठरवते.
3. संविधान सभेने याचा मसुदा तयार केला होता. 389 सदस्यांच्या संविधान सभेला स्वतंत्र भारताचं संविधान बनवण्याचं ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस लागले. या दरम्यान 165 दिवसांच्या अवधीचे 11 अधिवेशनं आयोजित करण्यात आले होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट, 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्राफ्टिंग समितीची स्थापना केली होती.
4. हा मसुदा ना छापील होता ना टाईप केलेला होता. हा मसुदा हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये चक्क हाताने लिहिण्यात आला होता.
5. जेव्हा भारतीय संविधान अस्तित्त्वात आलं, तेव्हा देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
6. आपल्या संविधानाला 'Bag of borrowings' ही म्हटलं जातं. कारण यामध्ये विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करुन त्यांचा काही निवडक विचारांचा समावेश करण्यात आला आहे.