एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई, पुण्यात दहा हजारांना बसवलेला कॅमेरा गोव्यात चार लाखांना कसा? : काँग्रेसचा सवाल
काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ता उर्फान मुल्ला यांनी स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असून भाजपने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामावर आमच्याशी खुली चर्चा करावी, असं आव्हान दिलं.
पणजी (गोवा) : पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून भाजपने या मुद्द्यावर खुली चर्चा करावी, असं आव्हान काँग्रेसने आज पुन्हा दिलं. त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यात दहा हजार रुपयांत बसवलेला कॅमेरा गोव्यात चार लाख रुपयांना कसा, असा प्रश्न उपस्थित करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. पणजीचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक होते. त्यामुळे काँग्रेसकडून स्मार्ट सिटीच्या कामांमधील दोष शोधून कुंकळ्येकर यांची गोची करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ता उर्फान मुल्ला यांनी स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असून भाजपने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामावर आमच्याशी खुली चर्चा करावी, असं आव्हान दिलं. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत श्वेतपत्रिका काढून माहिती द्यावी,अशी मागणीही मुल्ला यांनी यावेळी केली.
काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांचे निवडणूक एजंट साईश म्हांबरे यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीमध्ये 180 कोटी रुपये खर्च करुन बसवल्या जाणार असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केला. ज्या एलअँडटी कंपनीला हे कंत्राट दिले आहे, त्यांनी मुंबई आणि पुण्यात देखील कॅमेरे बसवले असून तेथे त्यांची किंमत हजाराच्या घरात आणि पणजीत चार लाख कशी याचे उत्तर भाजपने द्यावं, अशी मागणी म्हांबरे यांनी यावेळी केली. सीसीटीव्ही बसवण्याचे टेंडर निघाले नाही तर एलअँडटीला 21 कोटी रुपये का अदा केले, पैसे अदा करुनही आजपर्यंत काम का सुरु झालं नाही, असे प्रश्न देखील म्हांबरे यांनी उपस्थित केले.
सगळ्या कामांची दक्षता खात्यातर्फे चौकशी व्हावी,अशी मागणी करत आम्ही लोकायुक्तांकडे देखील तक्रार करणार असल्याचं म्हांबरे म्हणाले. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची पक्षाची मागणी कायम असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
विश्व
ठाणे
राजकारण
Advertisement