India Pakistan War: युद्ध थांबताच शाहबाज शरीफांकडून क्षी जिनपिंग यांचं तोंडभरुन कौतूक, चीनही म्हणाला, 'आपली मैत्री पोलादासारखी मजबूत'
India Pakistan War ceasefire violation: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध शस्त्रसंधी करारामुळे थांबले आहे. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अमेरिका आणि चीन यांच्याकडून होत आहे.

China Supports Pakistan: अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी करार झाल्यानंतर आता चीनचा दुतोंडीपणा जगासमोर आला आहे. चीन कायमच पाकिस्तानला पाठबळ पुरवत आला आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धाच्या निमित्ताने ही बाब आणखी अधोरेखित झाली. एकीकडे चीनने (China) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack) निषेधाची भाषा केली. मात्र, दुसरीकडे शस्त्रसंधी झाल्यानंतर चीनने पाकिस्तानचा उल्लेख 'पोलादासारखा मजबूत मित्र' असा केला आहे. एवढेच नव्हे तर आम्ही पाकिस्तानचे सार्वभौमत्त्व आणि अखंडता जपण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही चीनने म्हटले. यानंतर एकीकडे पाकिस्तानच्या छुप्या दहशतवादाला बेगडी विरोध आणि दुसरीकडे भारताविरोधात पाकिस्तानची तळी उचलण्याचा चीनचा दुतोंडीपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी 'एक्स'वरुन पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी राजी असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानशी शस्त्रसंधी करार झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही चर्चांनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी चीनच्या पुढाकाराने झाल्याचा दावा होत आहे. चीन, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या देशांच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधी झाली, असे म्हटले जात आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने समेट घडवून आणल्याचे म्हटले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी ही पूर्णपणे द्विपक्षीय चर्चेचे फलित आहे. त्यामध्ये कोणताही बाहेरचा हस्तक्षेप झालेला नाही. पाकिस्तान कोणत्याही अटी-शर्तींशिवाय या शस्त्रसंधीसाठी राजी झाल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांनी मानले चीनचे आभार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा होताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केले होते. यावेळी शाहबाज शरीफ यांनी चीनचे आभार मानले. मी चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि तेथील जनतेचे आभार मानतो. गेल्या 58 वर्षांपासून तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात, असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले.
चीनकडून प्रादेशिक राजकारणात पाकिस्तानचा प्यादासारखा वापर
चीनविषयी भारतात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाच्या विचारसरणीनुसार चीन हा राजनैतिक समस्यांबाबत संतुलित भूमिका घेणारा देश आहे. तर काहींच्या मते चीन हा पाकिस्तानच्या बाजूला झुकलेला आहे. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, चीनकडून सध्या दक्षिण आशियाई परिसरात आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी चीनकडून पाकिस्तानचा प्यादासारखा वापर केला जात आहे. तर भारताशीही राजनैतिक संबंध सुरळीत ठेवण्यासाठी चीनकडून दहशतवादाबाबत भाष्य केले जाते. अशाप्रकारे चीन दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहे.
भारताने अद्याप चीनच्या या दुतोंडी भूमिकेबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आगामी काळात या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा
कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या चीनचा अजित डोवालांना फोन, म्हणाले....
















