Chandrayaan 3 Mission: एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज, श्रीहरीकोटामध्ये सुरु झालं सर्वात महत्त्वाचं काऊंटडाऊन
Chandrayaan 3 Mission: चांद्रयान-3 चं श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन दुपारी 2.35 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.
Chandrayaan 3 Mission: भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून (ISRO) एका महत्वपूर्ण मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. इस्रोसोबतच संपूर्ण भारताचं स्वप्न असलेलं चांद्रयान -3 लवकरच अंतराळात झेपावणार आहे. चांद्रयान -3 (Chandrayaan 3) हे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन 14 जुलै रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने उड्डाण करणार आहे. खरंतर 2029 मध्ये भारतानं चांद्रयान-2 मोहीम राबवली होती.
पण चांद्रयान-2 मध्ये विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी चांद्रयान - 3 च्या मोहिमेची आखणी करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान - 3 विकसित करण्यात आले होते. आता ही मोहीम श्रीहरीकोटा येथून उड्डाणासाठी सज्ज झाली आहे.
कसा असणार चांद्रयान -3 चा घटनाक्रम?
14 जुलै रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन चांद्रयान -3 चे प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर 16 मिनिटांनी रॉकेटमधून चांद्रयान-३ विलग होईल. पुढे हे चांद्रयान पृथ्वीच्या दिर्घ कक्षेत जाणार आहे. काही दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे.
गती वाढल्यानंतर यान चंद्राच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. हे यान प्रोपल्जन मॉड्यूलच्या साह्याने चंद्राजवळ जाणार आहे. तर ऑगस्ट अखेरिस चांद्रयानातील लॅण्डर उतरण्याची प्रक्रिया होणार आहे.
काय आहे चांद्रयान -3 चं उद्दिष्ट?
चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच भारताच्या या चांद्र मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी देखील मदत होणार आहे. इस्रोचे लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM3) नावाचे तीन-स्टेज रॉकेट चांद्रयान-3 अंतराळयानासह रोबोटिक मून लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षामध्ये भरारी घेणार आहे. यामध्ये विक्रम लँण्डरचा समावेश करण्यात आला आहे. विक्रम लँण्डर हे हवामानाची माहिती गोळा करण्यास मदत करणार आहे. तर यामध्ये एक रोव्हर देखील आहे. रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा करण्यास मदत करणार आहे.
चांद्रयान -3 ची मोहिम यशस्वी झाल्यास चांद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे देश चंद्रावर जाण्यास यशस्वी ठरले आहेत. पण जर चांद्रयान - 3 चा घटनाक्रम जेव्हा यशस्वी होईल तेव्हाच चांद्रयान -3 चा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ही मोहीम यशस्वी होणार असल्याचा विश्वास देखील शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण भारतासह जगाला प्रतिक्षा लागून राहिली आहे ती चांद्रयान - 3 च्या प्रक्षेपणाची आणि त्याच्या यशस्वी लँण्डिंगची.
हे ही वाचा: