मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Aadhaar-Voter ID linking : केंद्र सरकारने निवडणूक मतदार नोंदणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Voter ID Link With Aadhar : केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तीन मोठे बदल केले आहेत. यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. त्यासोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात येणार आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी असलेल्या एक जानेवारीच्या मुदत तारखेमुळे अनेक युवकांना मतदान नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. एक जानेवारी ही तारीख असल्याने दोन जानेवारी व त्यानंतर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार नोंदणी करता येत नव्हती. त्यांना थेट पुढील वर्षाची प्रतिक्षा करावी लागत होती.
नुकतेच, कायदा आणि न्याय मंत्रालयाने संसदेच्या एका समितीला सांगितले की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 14B मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून दरवर्षी मतदार नोंदणीसाठी चार तारखा असतील. यामध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार नाही.
मार्चमध्ये तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले होते की, एकाच व्यक्तीची दुबार मतदार नोंदणी करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी होण्यास आळा घातला जाईल.
पोस्टल मतपत्रिका
यासोबतच सुरक्षा दलात काम करणाऱ्या महिलांच्या पतींना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. सध्याच्या तरतुदींनुसार कोणत्याही सैन्याच्या पत्नीला सैन्य मतदार म्हणून नोंदणी करता येऊ शकेल. मात्र, महिला सुरक्षा दलाच्या पतीला हा अधिकार नाही. मात्र, प्रस्तावित विधेयकानंतर संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली जाणार आहे. या कायद्यात पत्नी हा शब्द वगळून त्या ठिकाणी spouse (पती/पत्नी) या शब्दाचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
