CBSE 12th Exam Results 2021 : सीबीएसई 12 वी निकालासाठी गठीत समिती 18 जूनला अहवाल सादर करणार
CBSE Board 12th Results 2021, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्थापन केलेली समितीकडून अद्याप बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत सूचना देणे बाकी आहे. कोरोना साथीमुळे बारावीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई 12 वी च्या निकालासाठी गठीत समिती 18 जून रोजी आपला अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे फॉर्म्युला ठरवण्यात येईल. त्या आधारे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाचा निकाल निश्चित केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्थापन केलेली समितीकडून अद्याप बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत सूचना देणे बाकी आहे. कोरोना साथीमुळे बारावीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
पर्यायी मूल्यमापन प्रक्रियेच्या सुचनेसाठी स्थापन झालेल्या 13 सदस्यांची समिती सोमवारी आपला अहवाल सादरे करणार होती. मात्र त्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही. पारदर्शक आणि निष्पक्ष निकष अवलंबण्याबाबत बर्याच चर्चा झाल्या आहेत. अंतिम सूचना लवकरच सादर केल्या जातील.
सूत्रांच्या माहितीनुसार, समितीचे बहुतेक सदस्य दहावी आणि अकरावीच्या गुणांना वेटेज देण्याच्या व बारावी पूर्व-बोर्ड आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे मुल्यांकन ण्याच्या बाजूने आहेत. मात्र याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे आणि काही दिवसांत अहवाल सादर केला जाईल.
सुप्रीम कोर्टाने 3 जून रोजी केंद्र सरकारला इयत्ता 12 वी साठीचे निकष ठरविण्यासाठी दोन आठवडे दिले होते. सीबीएसईने यासाठी 4 जून रोजी 13 सदस्यांची समिती गठीत केली होती आणि अहवाल सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली होती.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र लिहून दहावी, अकरावी आणि पूर्व बोर्ड परीक्षेत मिळवलेले गुण 12 वी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाला आधार बनवावेत, अशी सूचना केली होती. केंद्र सरकारने 1 जून रोजी सीबीएसई 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले होते.