(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arvind Kejriwal: मद्य विक्री धोरण घोटाळा: दिल्लीचे CM केजरीवाल यांची सीबीआयकडून 9 तास चौकशी, केजरीवाल म्हणतात, हे तर...
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने आज 9 तास चौकशी केली.
Arvind Kejriwal: दिल्ली मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची आज सीबीआयने (CBI) जवळपास 9 तास चौकशी केली. चौकशी सुरू असताना केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र केजरीवाल सीबीआय कार्यालयातून बाहेर येताच सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला.
माध्यमांसोबत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मी सीबीआयने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. हा संपूर्ण कथित दारू घोटाळा खोटा आणि गलिच्छ राजकारणाने प्रेरित आहे. आम आदमी पक्ष हा कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. आम्ही मरणार पण आमच्या सचोटीशी कधीही तडजोड करणार नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.
दरम्यान, केजरीवाल यांच्या चौकशीच्या वेळी सीबीआय मुख्यालयाजवळ आंदोलन करणारे खासदार राघव चड्ढा, संजय सिंह, आतिशी, कैलाश गेहलोत आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह आपच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनाही काही तासांनी दिल्लीतील नजफगड पोलिस ठाण्यातून सोडण्यात आले.
सीबीआयकडून 56 प्रश्नांची विचारणा
केजरीवाल यांनी सीबीआय अधिकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की सीबीआय अधिकाऱ्यांनी मनापासून आणि अत्यंत आदराने प्रश्न विचारले. ते म्हणाले, 2020 सालापासून आतापर्यंत प्रकरणाशी संबंधित 56 प्रश्न विचारण्यात आले. मी त्या सर्वांची उत्तरे दिली आहेत.
केजरीवाल यांनी केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. दिल्ली आणि पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या चांगल्या कामांना केंद्र सरकार घाबरले आहे, त्यामुळे 'आप'ला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळी 11 वाजल्यापासून चौकशी
मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने रविवारी जवळपास नऊ तास चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कडक पहारा असलेल्या सीबीआय मुख्यालयात पोहोचले. सुमारे नऊ तासांच्या चौकशीनंतर रात्री 8.30 वाजता केजरीवाल इमारतीतून बाहेर आले. या चौकशी दरम्यान केजरीवाल यांनी जेवणासाठी ब्रेक घेतला होता.
सिसोदिया यांना चौकशीनंतर झाली होती अटक
AAP नेते मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. सिसोदिया यांनी सीबीआय अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नव्हती. अटकेनंतर सिसोदिया यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.