एक्स्प्लोर
बंजी जम्पिंग बनणार गोव्याची नवीन ओळख
'या या मया या' हे गाणे बरेच प्रसिद्ध आहे. गोव्यात पर्यटकांना बोलावताना या गाण्याची धून वाजवली जाते.आता मये गावात प्रसिद्ध मये तलावाच्या काठावर सुरु झालेल्या बंजी जंपिंगचा थरार अनुभवायचा असेल तर त्याच गाण्यातील मये गावात यावे लागणार आहे.

पणजी : रमणीय समुद्र किनारे, सुरुची बने, चर्च, मंदिरे ही आतापर्यंत गोव्याची ओळख होती. त्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात येत असतात. आता उत्तर गोव्यातील मये येथे सुरु झालेल्या बंजी जम्पिंगच्या थरारामुळे गोव्याला नवीन ओळख मिळणार आहे. 'या या मया या' हे गाणे बरेच प्रसिद्ध आहे. गोव्यात पर्यटकांना बोलावताना या गाण्याची धून वाजवली जाते. आता मये गावात प्रसिद्ध मये तलावाच्या काठावर सुरु झालेल्या बंजी जंपिंगचा थरार अनुभवायचा असेल तर त्याच गाण्यातील मये गावात यावे लागणार आहे. सरकारने मये तलावाचे सुशोभीकरण करताना तलावाच्या काठावर बंजी जम्पिंग सुरु करुन पर्यटकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पणजीपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मये गावात हिरव्यागार डोंगरांच्या मधोमध बसलेल्या हिरव्यागार तलावाच्या काठावर हा नवीन उपक्रम 27 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर आणि विधानसभा सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. तब्बल 170 फूट ऊंचीचा प्लॅटफार्म यासाठी उभरण्यात आला आहे. 15 मजली इमारती एवढा हा प्लॅटफार्म आहे. एका लिफ्टमधून टेरेसवर जावे लागते. 40 सेकंदात लिफ्टवर पोहोचते. तेथे तलावाच्या दिशेने रॅम्प उभरला असून सभोवती हिरवेगार डोंगर आणि खाली तलावाचे हिरवेगार पाणी, जणू अॅमेझॉनमध्ये तर आपण नाही ना असा भास झाल्याशिवाय राहत नाही. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली सर्व सुरक्षा मापदंड पूर्ण केल्यानंतर तलावाच्या दिशेने झेपावत जम्प मारल्यावर निर्माण होणारा थरार निश्चितच रोमांचित करणारा असतो. भारतात ऋषिकेशनंतर फक्त गोव्यातच बंजी जम्पिंगची सुविधा आहे. त्यामुळे बंजी जम्पिंगचा थरार अनुभवायचा असेल तर खतरों के खिलाडी बनून पर्यटकांना गोव्यात यावे लागेल.
आणखी वाचा























