(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BS Yediyurappa: अनेकवेळा भाजपने मला बाजूला सारलं... सक्रिय राजकारणातून निवृत्त होताना काय म्हणाले बीएस येडियुराप्पा?
BS Yediyurappa Retirement: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं.
BS Yediyurappa Retirement: दक्षिण भारतात भाजपचे कमळ फुलवणारे वरिष्ठ नेते बीएस येडियुराप्पा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. बीएस येडियुराप्पा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी आज विधानसभेतील आपलं शेवटचं भाषण केलं. अनेकवेळा भाजपने मला बाजूला सारलं असं मी आधी म्हणालो होतो, पण मला मुख्यमंत्रीपदासाठी संधीही दिली असं येडियुराप्पा म्हणाले. सक्रिय राजकारणातून जरी निवृत्त झालो असलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपसाठी काम करणार असं ते म्हणाले.
कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने बोलताना येडियुराप्पा म्हणाले की, "मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण भाजपला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हे माझे एकमेव ध्येय आहे आणि मला खात्री आहे की ते होईल."
येडियुराप्पा यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी केली होती. आज त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. येडियुराप्पा यांनी आतापर्यंत चार वेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आपल्या निरोपाच्या भाषणात येडियुराप्पा म्हणाले की, अनेक प्रसंगी भाजपने मला बाजूला केलं होतं अशी टिप्पणी मी केली होती, परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतक्या संधी इतर कोणत्याही नेत्याला मिळालेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी सदैव ऋणी राहीन."
PM Modi on BS Yediyurappa's assembly address: पंतप्रधानांनी केलं येडियुराप्पा यांच्या भाषणाचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बीएस येडियुरप्पा यांच्या निरोपाच्या भाषणाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, "भाजपचा एक कार्यकर्ता या नात्याने मला येडियुराप्पा यांचे भाषण खूप प्रेरणादायी वाटले. ते आमच्या पक्षाच्या नीतिमत्तेचे दर्शन घडवते. त्यामुळे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल."
बीएस येडियुरप्पा 1988 मध्ये कर्नाटक भाजपचे अध्यक्ष झाले. 1983 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेच्या विधानसभेत निवडून आले आणि तेव्हापासून त्यांनी सहा वेळा शिकारीपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भाजप नेतृत्वाशी वाद झाल्यानंतर बीएस येडियुराप्पा यांनी भाजपमधून बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापनाही केली होती. त्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले.
ही बातमी वाचा: