भाजप देवांचा पक्ष, तर ममता बॅनर्जी राक्षसी; भाजप आमदाराने गरळ ओकली
भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर राक्षसी संस्कार असल्याचं वक्तव्य सिंह यांनी केलं आहे.
लखनौ : भाजपचे उत्तर प्रदेशमधील आमदार सुरेंद्र सिंह नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत असतात. पुन्हा एकदा नवं वक्तव्य करुन त्यांनी गोंधळ उडवून दिला आहे. सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर राक्षसी संस्कार असल्याचं वक्तव्य सिंह यांनी केलं आहे.
सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधल्या बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघाचे आमदार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलत असताना सिंह यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सिंह म्हणाले की, हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या शरणार्थिंना ममता बॅनर्जी संरक्षण देत आहेत. अशा नेत्याला आपण राक्षस म्हणायला हवं.
सुरेंद्र सिंह म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा देवांचा पक्ष आहे. तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष हे राक्षसांचे पक्ष आहेत. दहशतवाद्यांना संरक्षण देणे म्हणजे राक्षसांना संरक्षण देणे. हेच काम हे तिन्ही पक्ष करत आहेत.
तुमची टॉयलेट-गटारं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही : साध्वी प्रज्ञासिंह