Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला
Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत असून मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.
Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आज राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही मतपेटीत बंद होणार आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बिहार निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे.
बिहार निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं असून त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'बिहार विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करावा. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मास्कचादेखील वापर करावा'
पंतप्रधान मोदींसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही बिहारच्या जनतेला आवाहन करणारं एक ट्वीट केलं आहे. अमित शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'बिहारच्या प्रत्येक नागरिकाच्या अत्यंत मौल्यवान मतानेच राज्याला लूट आणि गुन्हेगारीच्या काळ्या युगातून बाहेर काढून विकास आणि सुशासनाच्या सोनेरी रस्त्यावर आणले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदारांना आवाहन करतो की, राज्यातील शांतता, समृद्धि आणि प्रगती कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करा.'
बिहार विधानसभा निवडणूक ही कोरोना काळात पार पडणारी सर्वात मोठी निवडणूक आहे. तसेच कोरोना संकटामुळे मतदान केंद्रावरही सुरक्षेसाठी उपयायोजना करण्यात आल्या आहेत. एवढंच नाहीतर कोरोना काळात सोशल डिस्टंसिग लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. 94 पैकी 86 मतदारसंघात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. तर उरलेल्या मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे निवडणूक आचारसंहिते उल्लंघन नाही: निवडणूक आयोग
- बिहारच्या ऐन रणधुमाळीत प्रशांत किशोर गायब, पीकेंच्या अलिप्ततेमागे कुठली रणनीती दडलीय?
- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छितायत?
- लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य