Bihar Election : बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसला धक्का, हेमंत सोरेन यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघ ठरले, पार्टीच्या सचिवांची माहिती
Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागा वाटप निश्चित झालंय. दुसरीकडे महागठबंधन मधील तिढा सुटलेला नाही.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा भाग असलेल्या हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं स्वतंत्रपणे 6 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. महागठबंधनमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार या पक्षांनी दिले आहेत. अशातच झारखंड मुक्ती मोर्चाचा हा निर्णय देखील काँग्रेस आणि राजदला धक्का मानला जात आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे 6 जागा लढणार आहे. पक्षाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी ही घोषणा केली आहे. चकाई, कटोरिया, धमदाहा, पिरपैंती, मनिहारी आणि जुमई या मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चा स्वतंत्रपणे लढेल.
राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांमधील वाद सुटलेला नाही. आतापर्यंतच्या माहितीनुसार 7 जागांवर महागठबंधनच्या पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. लालगंज, वैशाली राजापाकर, बछवाडा, रोसरा आणि बिहारशरीफ या जागेवर महागठबंधनचे पक्ष आमने सामने आहेत.
सिकंदरा विधानसभा मतदारसंघावरुन देखील काँग्रेस आणि राजदमध्ये वाद आहेत. काँग्रेसनं विनोद चौधरी यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. तर राजदच्या चिन्हावर माजी अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी या जागेवरुन उमेदवारी अर्ज भरला आहे. या प्रकारची स्थिती एकूण सात मतदारसंघांमध्ये आहे.
राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानं महागठबंधनपासून वेगळं होणं याला वेगळा अर्थ आहे. झारखंड- बिहारच्या सीमेकडील भागात वर्चस्व वाढवण्याचा झारखंड मुक्ती मोर्चाचा प्रयत्न आहे. दरम्यान, महागठबंधनच्या नेत्यांकडून झामुमोच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान दोन टप्प्यात पार पडणार आहे. 121 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला पार पडणार आहे. मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा एनडीए आणि महागठबंधन यांच्यासह प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष रिंगणात आहेत. एनडीएमध्ये भाजप, जनता दल संयुक्त, हम, उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष आरएलकेजे आहे. तर, महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, सीपीआय माले लिबरेशन, सीपीआय, सीपीएम, मुकेश साहनी यांचा व्हीआयपी हे पक्ष आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयूच्या एनडीएनं विजय मिळवला होता. एनडीएनं नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केलं होतं. यावेळी बिहारची जनता विधानसभा निवडणुकीत कुणाला संधी देते हे पाहावं लागणार आहे.
























