Bihar Election : एनडीएला मोठा धक्का, सिने क्षेत्रातून राजकारणात आलेल्या अभिनेत्रीचा अर्ज रद्द, चिराग पासवान यांनी पहिली जागा गमावली, राजदसाठी गुड न्यूज
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआला पहिला धक्का बसला आहे. छपरा जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाच्या उमेदवार सीमा सिंह यांना उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. सीमा सिंह या भोजपुरी सिनेमा क्षेत्रातील नामांकित अभिनेत्री आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी चिराग पासवान यांच्या पक्षात प्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवलं होतं. मात्र, सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज झाल्यानं या जागेवर राजद विरुद्ध जनसुराज अशी लढत होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार सीमा सिंह यांच्या उमेदवारी अर्जात काही तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवला आहे. सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं मढौरा विधानसभा मतदारसंघात एनडीएला मोठा धक्का बसला आहे. या जागेवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मढौरा विधानसभा मतदारसंघात एनडीए आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होईल, अशी शक्यता होती. मात्र, या जागेवर सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानं एनडीएला मोठा धक्का बसला आहे. या जागेवर राजद आणि जनसुराज पार्टीत लढत होईल. या मतदारसंघात राजदनं विद्यमान आमदार जितेंद्र कुमार राय यांना उमेदवारी दिली आहे. ते यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत.
कोण आहेत सीमा सिंह?
लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाच्या उमेदवार आणि प्रसिद्ध भोजपुरी चित्रपट अभिनेत्री सीमा सिंह राजकारणात दाखल झाल्या होत्या. चिराग पासवान यांच्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिल्यानं मढौरा मतदारसंघातील लढत रोमांचक बनली होती. मात्र, आता त्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेल्या आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सीमा सिंह यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि संपत्तीची विस्तृत माहिती दिली होती. ज्यामुळं लोकांचं लक्ष वेधलं होतं. सीमा सिंह यांचं शिक्षण नववी पास आहे. त्या 999 मध्ये महाराष्ट्रातील ठाणे येथी द रेम हेगर हिंडे हायस्कूल, डोंबिवली पूर्व मधून नववी उत्तीर्ण झाल्या.
पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला
बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे. एनडीएनं सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजप-जदयू 101-101, लोजपा रामविलास 29, जीतनमराम मांझी यांच्या पक्षाला 6 आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलकेजे पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत.
























