(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arvind Kejriwal On Employment : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार
दिल्लीत पुढील पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. याचबरोबर दिल्लीला फूड हब बनवण्यात येणार आहे.
Arvind Kejriwal On Employment: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत पुढील पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. याचबरोबर दिल्लीला फूड हब बनवण्यात येणार असल्याची माहिती देखील केजरीवाल यांनी दिली आहे. आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी ही घोषणा केली.
आज बेरोजगारीची गंभीर समस्या आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या सरकारने 12 ते 13 लाख तरुणांना रोजगार दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. त्याचबरोबर पुढील 5 वर्षात किमान 20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली ही भारताची अन्नधान्याची राजधानी मानली जाते. जगभरातील सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ दिल्लीत उपलब्ध आहेत. कुठे तिबेटी, कुठे चायनीज, कुठलेही पदार्थ खायला मिळतात. आता त्यांचा विकास करण्याचा सरकारचा विचार आहे, जेणेकरून रोजगार निर्मिती होईल असेही केजरीवाल यांनी सांगितले.
दोन फूड हब तयार होणार
आम्ही भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन आणि त्यानंतर अन्न सुरक्षेची व्यवस्था करु असेही केजरीवाल म्हणाले. यासोबतच फूड हबचे ब्रँडिंग केले जाईल, जेणेकरुन देशातून आणि जगातून लोक येऊ शकतील. आम्हाला आशा आहे की यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पहिल्या टप्प्यात, आम्ही दोन फूड हब तयार करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. एक म्हणजे मजनू का टिळा आणि दुसरे चांदनी चौक या ठिकाणी फूड हब तयार करण्यात येणार आहे.
फूड हब डिझाइन करण्याची तयारी
फुड हबच्या संदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अनेक बैठका घेतल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले. आम्ही यासाठी एक डिझाईन स्पर्धा आयोजित करणार आहोत. जेणेकरून हे दोन फूड हब डिझाइन केले जातील. त्याचे काम पुढच्या 6 आठवड्यांत पूर्ण होईल. त्यांच्या अनुभवाच्या आधारे उर्वरित फूड हब विकसित केले जातील. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे केजरीवाल म्हणाले.