और एक फायनल...एक कप की ओर
T20 World Cup 2024, IND vs SA Final : वनडे वर्ल्डकपची फायनल खेळून सात महिने उलटताच रोहितसेना टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या भैरवीची मैफल गाणार आहे. तिथेही फायनलपर्यंत पराभवाचा स्पीड ब्रेकर आला नव्हता, तशीच इथेही गाडी पराभवाचं तोंड न बघता अगदी स्मूथली फायनलपर्यंत दाखल झालीय. फायनलमध्ये मोठ्या सामन्यांमध्ये ढेपाळल्याचा लौकिक असल्याने ‘चोकर्स’चा टॅग लागलेली आफ्रिकन टीम असणार आहे.
या स्पर्धेतला आपला परफॉर्मन्स हा वनडे वर्ल्डकपप्रमाणेच कुणा एकावर अवलंबून नाहीये. हा सिनेमा हिट व्हायलाही अकरा नायक आहेत. अर्थात लीड हिरो हिटमॅन रोहित शर्मा, जसप्रीत बुमरासारखे ज्येष्ठ खेळाडू असले तरीही सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, पंड्या, कुलदीप, अक्षर पटेल ही मंडळीही आव्हानांचा मेरु पर्वत उचलतायत. ऋषभ पंत तर भयंकर दुखापतीचा काळ एक दु:स्वप्न म्हणून त्याने मागे सारलाय आणि या खडतर काळाने तो आणखी कणखर झालाय. त्याच्या फलंदाजीत, क्षेत्ररक्षणात ते जाणवतंय. अर्थात रोहित म्हणाला, तसं या स्पर्धेतलं भारताचं सर्वात मोठं बलस्थान कोणतं असेल तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही निरनिराळी मैदानं, खेळपट्ट्या यांच्याशी उत्तम जुळवून घेतलंय. अमेरिका आणि वेस्ट इंडियन खेळपट्ट्यांवर होणाऱ्या या स्पर्धेत आपले पहिले काही सामने अमेरिकेत होते आणि आताचे विंडीज भूमीवर. फलंदाजीचा कस पाहणाऱ्या खेळपट्ट्यांसोबत सूर्याचा काळ्या ढगांशी लपंडाव, यामुळे सुरु असलेला ऊन-पावसाचा खेळ या आव्हानांचा मुकाबला करत आपण परफॉर्मन्सचा ग्राफ विजेतेपदाच्या पायरीपर्यंत नेलाय. निर्णायक सामन्यांमध्ये रोहितने जो गीयर टाकलाय. तो सुखावह आहे.
कांगारुंविरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजीची कत्तल केली, तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जेव्हा खेळपट्टी रंग दाखवतेय, हे त्याच्या लक्षात आलं, तेव्हा गीयर चेंज करुन चौकार, षटकारांवर ताव मारण्याऐवजी एकेरी-दुहेरी धावांची जखम इंग्लिश गोलंदाजीला केली. त्याचवेळी खराब चेंडूंना त्यांची जागाही दाखवली. यामुळे धावफलकाचं सौष्ठवही त्याने जपलं. सोबत सूर्यकुमार होता. त्याची तर सिक्सर ही फेव्हरेट डिश. त्यानेही या सामन्यात रोहितप्रमाणेच डाएट कंट्रोल केलं. फटक्यांचा मोह टाळला. खेळपट्टी या दोघांनीही अचूक वाचली. हे दोघं लागोपाठ बाद झाल्यावर गाडी ट्रॅक तर सोडणार नाही ना अशी धाकधूक वाटली. पण, या नव्या भारतीय संघाची हीच खास बात आहे की, मोठ्या प्लेअर्सच्या बाद होण्याचा दबाव न घेता मैदानात उतरुन परफॉर्म करणं. हार्दिकच्या 13 चेंडूंमधील 23 धावा, जडेजाच्या 9 चेंडूंमधील 17 धावा आणि अक्षरच्या 6 चेंडूंमधील 10 धावा या सोन्याच्या मोलाच्या आहेत. ज्यामुळेही आपला विजय झळाळून निघालाय. याच इंग्लंडने 2022 च्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये आपल्याला सेमी फायनलच्या दारातूनच परत पाठवलेलं. ती जखम मनात असणारच. सेमी फायनलमध्ये त्यांना चारी मुंड्या चीत करत यावेळी आपण त्यांचं पॅकअप केलंय. खास करुन इंग्लिश फलंदाजीच्या वेळी आपल्या फिरकीवर त्यांची उडालेली दाणादाण पाहून मन सुखावत होतं. अक्षर पटेल, कुलदीपच्या फिरकीवर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. ते आक्रमक शैलीत खेळून प्रतिवार करायला गेले. पण, आक्रमकतेच्या हव्यासाच्या या तलवारीने त्यांचेच हात, पाय, नाक कापलं. बटलर, सॉल्ट, बेअरस्टो, ब्रुकसारखे दिग्गज फलंदाज अकरामध्ये असताना 103 चा स्कोअर अत्यंत निराशाजनक होता. बटलरचे काही फटके वगळता इंग्लिश फलंदाजांभोवतीचा दबावाचा फास आपण प्रत्येक षटकागणिक आवळत नेला. बुमराचं वैविध्य, अर्शदीपची साथ, अक्षरकडे पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याचं असलेलं अफलातून कौशल्य, कुलदीपचा गुगली, त्याच्याकडे असलेला टर्न. यासर्वांसमोर इंग्लंडची फलंदाजी शरण गेली.
आता फायनलमध्ये गाठ दक्षिण आफ्रिकेशी आहे. दक्षिण आफ्रिकाही स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिलीय. असं असलं तरीही भारतासारखी विजयाची सफाई त्यांच्या कामगिरीत नाहीये. नेपाळची मॅच एक धावेने, बांगलादेशची मॅच चार धावांनी, इंग्लंडची मॅच सात धावांनी त्यांनी कुंथत कुंथत जिंकली होती. तर, विंडीजविरुद्धही 123 करताना त्यांचे घामाचे पाट पाहिले होते. सेमी फायनलला मात्र त्यांनी अफगाणिस्तानला चिरडून टाकलं. दक्षिण आफ्रिकेकडेही 1998 च्या आयसीसी नॉक आऊट ट्रॉफीचा अपवाद वगळता एकही आयसीसी चषक त्यांच्याकडे नाहीये. नॉकआऊटमध्ये ते पचकतात असा त्यांच्या नावावर नकोसा रेकॉर्ड आहे. हा डाग पुसून टाकण्यासाठी ते जोमाने खेळायचा प्रयत्न करणार हे नक्की.
डीकॉक, क्लासेन, मिलरसारखे काही चेंडूंत मॅचचा रंग बदलणारे घातक बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. रबाडा, यानसेनसोबत शमसी, महाराजसारखे त्रासदायक ठरु शकणारे फिरकीपटूही त्यांच्याकडे आहेत. क्षेत्ररक्षणही त्यांची कायम जमेची बाजू राहिलीय. सामना नॉक आऊटचा अर्थात फायनलचा आहे. नॉक आऊटचं थ्रिल, त्याची ब्युटी हीच असते की, त्या दिवसाचा खेळ तुम्हाला एकतर ट्रॉफी हातात देतो किंवा परतीचं तिकीट.
या फायनलमध्ये विराट कोहलीवर सर्वच क्रिकेटरसिकांचं लक्ष असणार आहे. फायनलपर्यंत शांत राहिलेली विराटची बॅट इथे तळपली तर दक्षिण आफ्रिकन टीमला ती अशांत करेल हे नक्की. इतके सलग सामने मोठी इनिंग कोहलीने न करण्याची आणि आपणही ती न पाहण्याची आपल्या दोघांनाही सवय नाहीये. बरं, कोहलीचा फॉर्म नाहीये, असं काही नाहीये. तर, मोठी इनिंग होत नाहीये. रोहितने म्हटल्यानुसार, फायनलसाठी कोहलीने ती राखून ठेवलीय. विराट आता नव्या रोलमध्ये ओपनिंगला खेळताना ही इनिंग करणार की, मधल्या फळीत ते पाहायचं. दोन ताकदवान संघ भिडतायत, नोव्हेंबरच्या वनडे वर्ल्डकपमध्ये फायनलला कांगारुंनी आपला घास काढला होता. आता समोर आफ्रिकन आर्मी आहे. त्यात 2007 चा टी-ट्वेन्टी, 2011 चा वनडे वर्ल्डकप आणि 2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर 11 वर्षांचा काळ लोटलाय, आपल्या कपाटातली आयसीसी ट्रॉफीची शोकेस रिकामी आहे. तिथे एक ट्रॉफी ठेवायची असेल तर तितकाच सफाईदार परफॉर्मन्स देत खेळाच्या तिन्ही अंगात दक्षिण आफ्रिकेला लोळवूया आणि आणखी एक कप जिंकूया. रोहितसेनेला ऑल द बेस्ट.