अरुणाचलमधील नदी काळवंडली, हजारो मासे मृत्यूमुखी; चीन कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा दावा
पाण्यातील टोटल डिझॉल्वड सबस्टन्सेस (Total Dissolved Substances-TDS) चे प्रमाण वाढल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.
इटानगर : अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) ईस्ट कामेंग जिल्ह्यातील कामेंग नदी काळवंडली आहे. या नदीमध्ये हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या नदीतील मासे कोणीही खाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पाण्याच्या या प्रदूषणाला चीन कारणीभूत असल्याचा दावा स्थानिकांनी केला.
अरुणाचल प्रदेशच्या सीमेच्या पलिकडे चीनने मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या प्रकल्पांची कामं सुरु केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून चीनमधून अरुणाचलमध्ये येणारी कामेंग या नदीमध्ये प्रदूषण झालं आहे. चीनच्या प्रकल्पामुळे या नदीच्या पाण्यामधील टोटल डिझॉल्वड सबस्टन्सेस (TDS) च्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. या नदीमध्ये सध्या टोटल डिझॉल्वड सबस्टन्सेसचे प्रमाण हे 6,800 मिली ग्रॅम प्रति लिटर असून ते खूपच जास्त आहे. साधारणपणे टोटल डिझॉल्वड सबस्टन्सेस हे 300 ते 1,200 मिली ग्रॅम प्रति लिटर इतकं असावं लागतं. त्यापेक्षा जास्त झाल्यास ते पाणी पिण्यासाठी हाणीकारक तर असतंच पण त्यामुळे जलचरांच्या जीवालाही धोका निर्माण होतो.
कामेंग नदीच्या या प्रदूषणासाठी चीन कारणीभूत असून चीनकडून जाणूनबूजून असा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेले हे आरोप चीनने नाकारले आहेत.
जर हे प्रदूषण पुढच्या काही दिवसांपर्यंत कायम राहिलं तर या नदीतील सर्व जलचर नष्ट होतील अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलून एक एक्सपर्ट कमिटीची नियुक्ती करावी अशी मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :