जम्मू काश्मीरमध्ये सुट्टीनिमित्त घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या
याआधीही सुट्टीवर आलेल्या जवान औरंगजेब आणि लेफ्टनंट उमर फैय्याज यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
जम्मू-काश्मीर : उत्तर काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यातील वारपोरा सोपोर परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय जवानाची गोळी घालून हत्या केली आहे. मोहम्मद रफिक याटू असं या जवानाचं नाव आहे. दहशतवाद्यांनी घरात घुसून सुट्टीवर आलेल्या रफिक यांची हत्या केली आहे.
मोहम्मद रफिक जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फन्ट्री (JAKLI) मध्ये कार्यरत होते. सुट्टीनिमित्त ते आपल्या घरी आले होते. दहशतवाद्यांनी त्यांना खुप जवळून गोळी घातल्याने ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफिक यांना गोळीबारानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करत शोधमोहित सुरु केली आहे.
सुट्टीनिमित्त घरी आलेल्या जवानांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सुट्टीवर आलेले जवान औरंगजेब आणि लेफ्टनंट उमर फैय्याज यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.