(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir Anantnag Encounter: अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यात कर्नल, मेजर आणि पोलीस उपअधीक्षकांना हौताम्य; TRF ने घेतली जबाबदारी, चकमक सुरू
Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांचा सामना करताना तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले आहे.
श्रीनगर, जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांचा सामना करताना तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे कर्नल, मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत त्यांना हौताम्य आले असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.
या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना TRF ने घेतली आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटचे कमांडिंग कर्नल मनप्रीत सिंग, आरआर मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट्ट या गोळीबारात गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
अधिकाऱ्याने सांगितले की, गडोले भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मंगळवारी संध्याकाळी सुरू झाली होती, मात्र ती रात्री थांबवण्यात आली. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा त्यांचा शोध सुरू झाला.
कर्नल सिंग यांनी आपल्या पथकाचे नेतृत्व करत दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. परिसरात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी विशेष दल तैनात करण्यात आले आहे. तीन ते चार दहशतवादी असल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न
लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी सांगितले की, "जम्मू आणि काश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा स्थितीतील प्रगतीला अडथळा आणण्यासाठी या प्रदेशात परदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
दहशतवादाविरोधात भारत एकजूट; काँग्रेसकडून शोक व्यक्त
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवर लिहिले, "आमच्या शूर लष्कराच्या जवानांनी आणि एका डीएसपीने जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमधील चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. आपले शूर जवानांच्या कुटुंबांप्रती शोक संवेदना व्यक्त करत असून भारत हा दहशतवादाविरोधात एकजुटीने मुकाबला करेल.
Our brave Army personnel and a DSP have made the supreme sacrifice fighting terrorists in an encounter at Anantnag in Jammu & Kashmir.
— Mallikarjun Kharge (@kharge) September 13, 2023
We are extremely saddened by their loss. Our deepest condolences to the families of our bravehearts.
India stands united against terrorism.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला. दक्षिण काश्मीरच्या कोकरनाग भागात झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या डीवायएसपीने सर्वोच्च बलिदान दिले. डीएसपी हुमायून भट्ट, मेजर आशिष आणि कर्नल मनप्रीत सिंग यांनी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपले प्राण गमावले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि या कठीण काळात त्यांच्या प्रियजनांना बळ मिळो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जवानांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "आज अनंतनागमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करत आहे.
हरियाणात वास्तव्यास होते मेजर आशिष
मेजर आशिष हे मूळचे हरियाणातील पानिपतमधील बिंझौल गावचे रहिवासी होते. सध्या त्यांचे कुटुंब पानिपतच्या सेक्टर-7 मध्ये भाड्याच्या घरात राहत आहेत.