Punjab Election News : मुख्यमंत्र्यांना पराभूत करत मुलगा झाला आमदार ; पण सफाई कामगार आई पोहोचली कामावर
आपचे लाभसिंग उगोके यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला. त्यानंतर लाभसिंग यांच्या आई बलदेव कौर या शाळेत आपल्या सफाई कामगाराच्या कामावर हजर झाल्या आहेत.
Punjab Election News : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि पंजाबचे मावळते मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनाही पराभवचा धक्का बसला आहे. भदौर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभसिंग उगोके यांनी मोठ्या फरकानं त्यांचा पराभव केला आहे. लाभसिंग हे मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करतात, तर त्यांचे वडील मजूर आणि आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे. दरम्यान, आपला मुलगा आमदार झाल्याचा कोणताही बडेजाव न करता लाभसिंग यांच्या आई बलदेव कौर या शाळेत आपल्या सफाई कामगाराच्या ड्युटीवर हजर झाल्या आहेत. त्यांना हे काम पुढे असेच सुरु ठेवायचे आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनाच काँग्रेसनं पुढील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र, त्यांचा देखील पराभव झाला. भदौरमधून लाभसिंग उगोके यांनी चरणजीतसिंग चन्नी यांचा तब्बल 37 हजार 550 मतांनी पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
लाभसिंगची आई बलदेव कौर यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब हे कष्ट करून घर चालवणारे कुटुंब आहे. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या मुलाला शिकवले आहे. आज त्यांचा मुलगा आमदार झाला आहे, त्याबद्दल खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. लाभसिंगचा सामना हा मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याशी होती. तरीसुद्धा त्याला पहिल्या दिवसापासून निवडणूक जिंकण्याची खात्री होती. माझा मुलगा आमदार झाला असला तरी तो यापुढेही आपले कर्तव्य बजावणार असल्याचे त्यांच्या आईने सांगितले. मी सफाई कामगार म्हणून काम करेल आणि या कमाईतूनच घर चालवेल असेही त्यांनी सांगितले. लोकांना माझा मुलगा लाभकडू खूप आशा आहेत. लाभ या क्षेत्रातील लोकांसाठी आरोग्य, शिक्षणासाठी चांगलं काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाभसिंग उगोके यांचा जन्म 06 ऑक्टोबर 1986 रोजी झाला. लाभ सिंह यांचे शालेय शिक्षण गावातील प्राथमिक शाळेतून तर बारावीचे शिक्षण सुखपुरा मोड गावात झाले. यानंतर त्याने मोबाईल रिपेअरिंग आणि प्लंबिंगमध्ये डिप्लोमा केला. गावात तीन वर्षे मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवल्यानंतर 2013 पासून त्यांनी पक्षात प्रवेश केला. 2017 मध्येही त्यांनी तिकिटाचा दावा मांडला होता. मात्र, त्यावेळी तिकीट मिळू शकले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिले आणि त्यांनी करिष्मा करुन दाखवला.
लाभ सिंग यांच्या कुटुंबात आई बलदेव कौर, वडील दर्शन सिंग, भाऊ सुखचैन सिंग, पत्नी वीरपाल कौर आणि दोन मुले आहेत. लाभसिंग यांचा भाऊ तीन महिन्यांपूर्वी भारतीय लष्करातून निवृत्त झाला आहे. आई बलदेव कौर गावातील सरकारी शाळेत सफाई कामगार आहे, वडील ड्रायव्हर आहेत. निवडणूक लढवण्यासाठी कुटुंब आणि गावातील लोकांनी लाभसिंग यांना पूर्ण पाठिंबा दिला होता.
लाभ सिंहच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की आम्ही पूर्वी जसे राहत होतो तसेच राहू. लोकांनी लाभसिंग यांना विजयी केले आहे. लाभसिंग यांच्या विजयामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. रात्रंदिवस पक्षाची सेवा करणारे लाभसिंग एक दिवस आमदार होतील, याचा विचार आम्ही कधीच केला नव्हता. त्याने लोकांची सेवा करावी अशी आमची इच्छा आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका अमृतपाल कौर यांनी सांगितले की, लाभसिंगची आई या शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत आहे. लाभसिंगही या शाळेचा विद्यार्थी राहिला आहे. त्यांनी आमदार होऊन गावाचा आणि शाळेचा नावलौकिक मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: