India Vs Pakistan War Mock Drill: उठा, सज्ज व्हा! मुंबई, पुणे, नाशिक ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील
India Vs Pakistan War Mock Drill: राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

India Vs Pakistan War Mock Drill: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत पाकिस्तान (India Vs Pakistan War Mock Drill) यांच्यातला तणाव कमालीचा वाढलाय. युद्धाचे ढग निर्माण झालेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पुढील16 ठिकाणी उद्या होणार युद्धाची मॉकड्रील-
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंंधुदुर्ग
1971 मध्येही राज्याराज्यात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं-
दरम्यान 1971 मध्येही पाकिस्तानशी युद्धाचे ढग जमा झाल्यावर राज्याराज्यात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं. तेव्ही शहरात सायरन वाजायचे, ब्लॅक आऊटचा सरावही केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात. एबीपी माझाच्या हाती १९७१ च्या वेळचे काही फोटो हाती लागलेत. 1971 मध्ये जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल काळ्या कपड्याने झाकून ठेवला होता. मॉक ड्रीलबाबत आणि युद्धा दरम्यान घ्यायच्या काळजीबाबत तेव्हा विविध वृत्तपत्रांनी बातम्या करत जनजागृती केली होती. लष्कराने आणि जिल्हा प्रशासनाने गावोगावी मॉक ड्रील घेत सराव केला होता.
सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद करा-
हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत. कारण लाईट सुरु राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष्य सहजपणे नजरेस पडेल. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे. जेणेकरुन आजुबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय, नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने बंद करावीत. जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील, त्यांच्यावर लक्ष ठेवावे. याशिवाय, हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरुन जाऊ नये, यासाठी मॉकड्रील महत्त्वाची असल्याचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले.
























