Santosh Bangar News : मंत्रिपद दिले तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल : आमदार संतोष बांगर
Santosh Bangar News : मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असत तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल, असं वक्तव्य हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर म्हणाले.
Hingoli MLA Santosh Bangar News : हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष बांगर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होणार आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही आक्रमक आहात, कार्यकर्त्याकडून मंत्रिपदाची मागणी केली जात आहे, तुम्हाला काय वाटते मंत्री मिळावे का? असं विचारलं असता ते म्हणाले की, "मंत्रिपद कोणाला नको? मंत्रिपद दिलं तर पुन्हा दहा हत्तीचं बळ माझ्यात येईल."
मी मंत्रिपदाच्या अपेक्षेने कुठलंही काम करत नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास असेल तर मुख्यमंत्री जे आदेश देतील त्या आदेशाचं मी पालन करणारा कडवट शिवसैनिक आहे. साहेबांच्या मनात असेल तर माझ्यावर जबाबदारी टाकतील. मी स्वतः मंत्रिपद मागणार नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही. बाळासाहेबांचे आशीर्वादच असे होते की शब्द टाकला की पूर्ण होत होता. शिंदेसाहेब तसेच बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. शिंदे साहेबांना वाटलं जबाबदारी द्यायची तर ते देतील. नाही दिली तरी मी सदैव शिवसेनेचा आमदार म्हणून कामासाठी तत्पर राहिन. मला मंत्रिपद मिळावं अशी अनेक कार्यर्त्यांच्या भावना आहे. तसं ते बोलून देखील दाखवतात. पण मुख्यमंत्री जे ठरवतील ते मान्य असेल.
मंत्रिपद दिले तर जबाबदारी स्वीकारणार का?
मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असत तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसैनिक वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. शिवसेनेचा मंत्री कसा असावा, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कसा असावा, आमदार कसा असावा हे मी सांगत तर आजूबाजूच्या परिसरातील लोकही सांगतात," असं संतोष बांगर म्हणाले.
संतोष बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवलं
हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना संतोष बांगर यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा धक्का दिला आहे. बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं. बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटातसहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का बांगर यांना दिला गेला आहे. 2009 सालापासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर बांगर यांच्या तोडीस तोड देणारा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी सुद्धा पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचणी करताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :