(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी ढसाढसा रडले, मग फुटले, आता हटवले! बंडखोर आमदार संतोष बांगर यांना शिवसेनेचा मोठा धक्का
Hingoli MLA Santosh Bangar News: शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिला आहे.
Hingoli MLA Santosh Bangar News: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिला आहे. बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का बांगर यांना दिला गेला आहे.
2009 सालापासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर बांगर यांच्या तोडीस तोड देणारा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी सुद्धा पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचणी करताना दिसून येत आहेत.
बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरेंसोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसून आले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी हेच संतोष बांगर ढसाढसा रडले होते. अख्ख्या मराठवाड्यातले शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात होते, फक्त संतोष बांगर ठाकरेंसोबत उभे होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढसाढसा रडलेही होते. पण स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणवणारे बांगर अवघ्या 24 तासांत हे शिंदे सैनिक झाले होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बांगर त्यांच्यासोबत कसे आले? याचा किस्सा सांगितला होता.
संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी हिंगोली शहरात शिवसैनिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत थेट उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शिवसैनिकांशी संवाद साधला. ज्यांना आपण दिले ते सोडून गेले ज्यांनी आपल्याला दिलं ते सोबत आहेत, असे बोलत ठाकरे यांनी संतोष बांगर यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता लढायचं आणि सर्वांना भेटायला मी येणार आहे, आसं आश्वासन यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलं होतं.